महानगरपालिकेसमोर काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररित्या फडकविलेला लाल – पिवळा हटविण्यासाठी समितीने मागणी केली होती. यासाठी प्रशासनाने 20 जानेवारी पर्यंतची वेळ मागितली होती. 20 तारखेपर्यंत हा ध्वज हटविण्यात नाही आला, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला होता. अद्यापही हा लाल – पिवळा हटविण्यात आला नसल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या वतीने ठरविण्यात आले होते. परंतु पोलीस प्रशासनाने या महामोर्चाला परवानगी नाकारली असून तूर्तास हा मोर्चाचे स्थगित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले कि, या मोर्चाच्या परवानगी साठी आम्ही पोलीस आणि प्रशासनाकडे विविध पर्याय ठेवले होते. यात सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे लाल – पिवळ्या सोबतच भगवा ध्वजदेखील त्याठिकाणी उभारण्यात येईल. जिल्हाधिकारी सध्या उपलब्ध नसल्याने ते ज्यावेळी येतील, त्यावेळी लाल – पिवळा आणि भगवा या दोन्हींच्या संदर्भात चर्चा करू. आणि त्या चर्चेतून निघालेला निर्णय हा सर्वानुमते घेतला जावा.
या वादावर योग्य तो तोडगा काढावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. उद्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक आरक्षणासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त उपलब्ध नाहीत. गृहमंत्र्यांच्या बेळगाव दौरा आणि इतर महत्वाच्या कामात जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त व्यस्त असल्याकारणाने सध्याचा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यासाठी डीसीपी विक्रम आमटे यांनी सल्ला दिला आहे. पुढील चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही तर तुम्ही तुमचा मोर्चा काढण्यास मोकळे आहेत, अशी सूचनादेखील डीसीपी आमटेंनी केली आहे, अशी माहिती दीपक दळवी यांनी दिली.
दोन दिवसांपासून पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी इतर कामात व्यस्त असल्यामुळे तूर्तास हा मोर्चा स्थगित करण्याची विनंती आमटेंनी महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि तमाम मराठी जनतेला केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी आणि पोलीस प्रशासनाशी कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्यास येत्या काळात नक्कीच भगवा ध्वज नियोजित ठिकाणी म्हणजेच महानगरपालिकेसमोर फडकावू, असा निर्धार दीपक दळवी यांनी व्यक्त केला.
गुरुवार दिनांक २१ रोजी होणार मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला असून उद्या समिती, शिवसेना आणि इतर मान्यवर जिल्हाधिकाऱ्यांची प्रातिनिधिक भेट घेणार आहेत. यासंदर्भात २४ किंवा २५ तारखेला सखोल चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ दिला आहे. याची दखल मराठी जनतेने घ्यावी, असे आवाहन दीपक दळवी यांनी केले आहे.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1308643676159889/
https://www.facebook.com/375504746140458/posts/1308644279493162/