लग्न म्हणजे भरजरी आधुनिक पोशाख केलेली मंडळी हे चित्र नेहमीचेच. परंतु क्रिकेट वेडा असणाऱ्या आपल्या मित्राच्या लग्नामध्ये त्याच्या संघातील सहकाऱ्यांनी क्रिकेट खेळताना घातला जाणारा पोशाख अर्थात निळी जर्सी परिधान करून कार्यालयात प्रवेश केला आणि वरासह सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
वडगाव येथील वाडा बॉईज क्रिकेट संघातील अभिजीत पावशे या खेळाडूचा विवाह अलीकडेच रामनाथ मंगल कार्यालय येथे पार पडला.
लग्नसोहळा म्हणजे प्रत्येक जण टीप टॉप पोशाखात असतो. परंतु अभीजितच्या विवाहप्रसंगी वाडा बॉईज संघातील त्याच्या इतर सहकारी खेळाडूंनी संघाच्या निळ्या जर्सीमध्ये उपस्थित राहणे पसंत केले.
क्रिकेट सामन्यासाठी आल्याप्रमाणे लग्नाला आलेल्या निळ्या जर्सीतील आपल्या सहकारी खेळाडूंना पाहून नवरदेव अभिजीत पावशे याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याच प्रमाणे निळ्या जर्सीतील हे वाडा बॉईज संघातील खेळाडू उपस्थित साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.