सालाबादप्रमाणे शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यंदाचे “पत्रकार पुरस्कार -2020” जाहीर करण्यात आले असून येत्या सोमवार दि. 18 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.
यंदा वाचनालयाच्या पत्रकार पुरस्काराकरिता मराठी विभागासाठी दै. रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर आणि कन्नड विभागासाठी दै. कन्नडम्माचे वार्ताहर राजशेखर हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार 2020 साठी मराठी विभागात बेळगावच्या दै. स्वतंत्र प्रगतीच्या संपादिका बबिता राजेंद्र पोवार व कन्नड विभागात बिग न्यूजच्या वार्ताहर भाग्यश्री सुनगार यांची निवड करण्यात आली आहे.
गणपत गल्ली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी हे पत्रकार पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जयवंत मंत्री, प्रशांत बर्डे, अनंत लाड व डॉ. सर्जू काटकर यांच्या निवड समितीने हा निर्णय घोषित केला आहे. यावेळी वाचनालयाचे अध्यक्षा सुनीता मोहिते, उपाध्यक्ष नेताजी जाधव, कार्यवाह रघुनाथ बांडगी व सहकार्यवाह आई. जी. मुचंडी उपस्थित होते.