Sunday, April 28, 2024

/

राष्ट्रीय पक्षांकडून विकासाचे गाजर मात्र येळ्ळूरवासीय मराठी अस्मितेवर ठाम-

 belgaum

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु झाली असून संपूर्ण सीमाभागातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावेळीही समितीचेच वर्चस्व प्रस्थापित करणार, आणि समितीचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यावर पहिल्या बैठकीत सर्वप्रथम सीमाप्रश्नी ठराव मांडणार असल्याचा निर्धार येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष राजू पावले यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘बेळगाव लाईव्ह’ ने राजू पावले यांच्याशी केलेली खास बातचीत-

येळ्ळूर ग्रामपंचायतीवर दोनवेळा सदस्यपदी निवडून आलेले राजू मारुती पावले हे तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत. मागील निवडणुकीत २ वेळा ग्रामपंचायतीवर समितीच्या झेंड्याखाली निवडून आलेले राजू पावले यांना यंदाच्या निवडणुकीत मात्र लोकप्रतिनिधींच्या कुटील राजकारणामुळे निवडणूक लढविणे शक्य झाले नाही. परंतु आपल्या पदापेक्षाही केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वर्चस्वासाठी तळमळीने कार्य करून महिला उमेदवाराला समितीच्या झेंड्याखाली निवडणूक रिंगणात उतरवून प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचा निर्धार येळ्ळूरवासियांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक उमेदवारांना फटका बसला असून ३० जागा असलेल्या या ग्रामपंचायतीवर ५ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. या पाच जणांमध्ये ४ उमेदवार हे समितीचे आहेत. आणि उर्वरित २५ उमेदवार हे बहुमताने निवडून येतील, असा विश्वास आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले.

येळ्ळूर गाव हे महाराष्ट्र एकीकरण समितीशी बांधील असून या निवडणुकीत ग्रामपंचायतीवर नेहमीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीचीच कब्जा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येळ्ळूर मधील मराठी जनता ही समितीच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारालाच मतदान करेल. समितीव्यतिरिक्त कोणत्याही इतर पक्षाच्या आमिषाला बळी पडणार नाही आणि समितीशिवाय कोणत्याही उमेदवाराला मत देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीशी बंडखोरी करून फुटीर गट तयार झाले. परंतु त्यांचे वर्चस्व खूप वेळ टिकू शकले नाही. त्यामुळे येळ्ळूर गाव हे केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीशी बांधील राहील, असे त्यांनी सांगितले.Raju pawale

 belgaum

अनेक राष्ट्रीय पक्षाच्यावतीने विकासाचे गाजर दाखविण्यात येत आहे. रस्ते, पाणी, स्टेडियम यासह अनेक मूलभूत सुविधा पुरविण्याचे आमिष राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी दाखविले आहे. परंतु ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीशिवाय कोणाचीही सत्ता आली नाही. सीमालढ्याचे साक्षीदार आणि सीमालढ्यातील अग्रणी गाव असलेले येळ्ळूर हे सीमाप्रश्न सुटेपर्यंत मराठी जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठीच झटेल, असा निर्धार माझ्यासह प्रत्येक गावकऱ्याने केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार प्रचार सुरु असून गावातील जनताही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती येळ्ळूर गावात नेहमीच होते. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचाच झेंडा फडकणार आणि निवडणूक जिंकल्यानंतर सर्व बंधने झुगारून सर्वप्रथम सीमाप्रश्नी ठराव मांडून संमत करणार असल्याचा निर्धार त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.