कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने प्रवासाच्या नियमावलीत बदल केला आहे. प्रवासी नियमात महाराष्ट्र सरकारने नवे नियम लागू केले असून या नियमांपासून वाचण्यासाठी गोव्यातील पर्यटकांनी नामी शक्कल लढविली आहे. हे पर्यटक कर्नाटकात प्रवेश घेऊन कर्नाटकातून महाराष्ट्रात विमान प्रवास करत आहेत.
दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यामधून मोठ्या प्रमाणात जनता महाराष्ट्रात प्रवेश घेत आहे. या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक आणि राज्य सीमेवरून प्रवेश घेताना आरटीपीसीआर चाचणी ही अत्यावश्यक आहे. विमान, रेल्वे किंवा आंतरराज्य सीमेवरून महाराष्ट्रात प्रवेश घेण्याआधी ही चाचणी करणे आवश्यक आहे. ही चाचणी टाळण्यासाठी अनेकजण गोव्यातून बेळगाव, हुबळी आणि मंगळूरमध्ये हवाईमार्गे येत आहेत. आणि याठिकाणाहून महाराष्ट्रातील मुंबई आणि इतर ठिकाणी प्रवेश घेत आहेत. जर ते थेट पणजीमधुन महाराष्ट्रातील विमानतळांवर प्रवास करत असतील तर त्यांना प्रवासाच्या नियमांचे पालन करावे लागेल, परंतु कर्नाटकहून उड्डाणे केल्यास ते नियम लागू होत नाहीत.
यासंदर्भात हुबळी विमानतळाचे संचालक प्रमोदकुमार ठाकरे म्हणाले कि, विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवली जात नाही. परंतु हल्ली विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून यापुढील काळात या नोंदी ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबईतील एका कुटुंबाने ही शक्कल लढवून ओल्ड गोवा येथून मंगळूर विमानतळ गाठून मंगळूरहून मुंबईसाठी उड्डाण केले आहे. यावेळी या कुटुंबाशी संपर्क साधला असता, अनावश्यक चाचणी टाळण्यासाठी आपण मंगळूरहून मुंबईसाठी उड्डाण केल्याचे स्पष्ट करण्यात आले.