आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मोठ्या संख्येने बेळगांवात येत असल्यामुळे शहरातील कचेरी रोड सध्या गर्दीने फुललेला दिसून येत आहे.अर्ज भरणे प्रक्रिया गावागावात सुरू असली तरी अर्जाच्या कागदपत्रांची जोडणा करण्याची गर्दी मात्र कचेरी रोडवर दिसून येत होती.
ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा घोषणा झाली असून ग्रामीण भागातील अनेक जण ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. सदर निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जासह अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज मंगळवार दुसरा दिवस आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास संदर्भातील संबंधित कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी सध्या शहरातील कचेरी रोडवरील नोटरी पब्लिक ऑफिस तसेच अन्य कार्यालयाच्या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांची गर्दी होताना दिसत आहे.
एकाच वेळी लोकांची गर्दी होत असल्यामुळे संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यात वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच जणांना ताटकळत थांबावे लागत आहे.
गर्दीमुळे काहीजण कचेरी रोड रस्त्याशेजारील इमारतींचे कठडे आणि दुकानांच्या पायऱ्यांवर बसून विश्रांती घेताना दिसत होते. त्याचप्रमाणे कांही जण गटागटाने उभे राहून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बाबत अंदाज बांधत होते. लोकांच्या गर्दीमुळे कचेरी रोडवर ये -जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहने संथगतीने हाकावी लागत होती.