Sunday, November 17, 2024

/

राजकारण आणि दोस्तीचे समीकरण !

 belgaum

राजकीय पातळीवर एकमेकांचे वैरी असल्याप्रमाणे आरोप-प्रत्यारोप करणारे राजकारणी राजकीय व्यासपीठामागे एकत्रित दिसून आले तर त्यात वावगं असं काही नाही. कारण राजकारण हे जनतेला दाखविण्यासाठी असते. परंतु राजकारणाच्या मागे प्रत्येक राजकारणी हा दुसऱ्या राजकारण्याशी मित्रत्वाचे नाते जपतोच. याचा प्रत्यय नुकताच सांबरा विमानतळावर आला आहे.

भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीसाठी आलेली नेतेमंडळी तसेच बेळगावमध्ये विविध ठिकाणी दौऱ्यावर आलेली काँग्रेसची नेतेमंडळी हि सांबरा विमानतळावर एकत्रित असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. केवळ एकत्रच नाही तर या राजकारण्यांनी एकत्रित, एकाच विमानातून बंगळूरला प्रयाण केले आहे. त्यामुळे राजकीय पडद्यावर एकमेकांचे शत्रू असणारे हे नेते राजकीय पडद्यामागे मात्र एकच आहेत, याचा प्रत्यय आला.

शनिवारी बेळगाव येथील सांबरा विमानतळावर अकस्मिक हे राजकीय नेते एकमेकासमोर आले. एकमेकासमोर येताच या नेत्यांसह उपस्थितांनाही आश्चर्य वाटले. शनिवारी रात्री काँग्रेस आणि भाजपमधील या नेत्यांनी एकत्रित विमान प्रवास करत एकमेकांशी गप्पाही मारल्या. या नेतेमंडळींमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री गोविद कारजोळ, महसूल मंत्री आर. अशोक, शोभा करंदलाजे यांच्यासह अनेक नेत्यांनी बेळगावहून बंगळूरसाठी एअर इंडिया विमानातून प्रवास केला.

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेसविरोधात नुकतेच एक विधान केले होते. या विधानानंतर कुमारस्वामी आपला मोर्चा भाजपाकडे वळवणार का? अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. विमानतळावर एकत्रित आलेल्या काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये कुमारस्वामींच्या वक्तव्यावरून राजकीय गोटात कोणते राजकारण तर शिजत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग हे बेळगावमध्ये हायकमांडचा निर्णय घेऊन आले होते, अशी माहिती उपलब्ध झाली होती. तो निर्णय कोणता आहे? कशासंदर्भात आहे? मुख्यमंत्र्यांपर्यंत तो निर्णय पोहोचला आहे का? आणि त्या निर्णयाशी विमानतळावरील घटनेशी संबंध आहे का? अशा उलट सुलट चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.