कौटुंबिक कलहातून क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे परिवर्तन खुनात झाल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे.
बिष्टप्पा कोनकीकोप्प (वय ४३) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी रात्री खानापूर तालुक्यातील कक्केरी या गावात मळणी सुरु असताना धान्याची रास लावण्यात येत होती.
या दरम्यान सासरा आणि जावयामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरु झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि हा वाद विकोपाला जाऊन संतापलेल्या सासऱ्याने जावयाचा शेतातील अवजाराच्या माध्यमातून जावयावर वार केला.
यावेळी जावयाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. यावेळी आरोपीला अटक करण्यात आली आहे.