नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणांसह अनेक मंडळी पार्ट्यांचे बेत आखत असतात. शहरापासून दूर काही अंतरावर जाऊन जागा मिळेल तिथे या पार्ट्याना ऊत येतो. शहराची सीमा संपली कि तालुक्यातील भागात शेतजमिनीवर या पार्ट्या बिनधास्तपणे सुरु असतात. दारू, जुगार, असे अनेक गैरप्रकारही होत असतात. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या वतीने वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात निवेदन देण्यात आले आहे.
शहापूर, जुने बेळगाव, वडगाव, माधवपूर, येळ्ळूर, धामणे सह या परिसरातील शेत शिवारात नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे पार्ट्यांच्या नावावर जुगारसारखे गैरप्रकार सुरु असतात. या परिसरात अल्पभूधारक शेतकरी आहेत. या जमिनी पिकाऊ असून बारमाही पीक या शेतजमिनीतून घेतले जाते. ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अनेक चैनबाज लोक या भागात पार्टी करण्यासाठी येतात. या भागात ३१ डिसेंबर रोजीच नाही तर सर्रास पार्ट्या आणि गैरप्रकार सुरु असतात.
या प्रकारामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शिवाय ३१ डिसेंबर रोजी या पार्ट्यांचे प्रमाणही अधिक असते. अनेकवेळा मद्यपी लोक धिंगाणा घालत असतात. दारूच्या नशेत पार्टी करणाऱ्यांमध्ये भांडणाचेही प्रमाण अधिक असते.
शेतशिवारात दारूच्या बाटल्या तशाच फेकण्यात येतात. तसेच पार्टी झाल्यानंतर कचराही टाकण्यात येतो. हा सारा प्रकार पाहून शेतकऱ्यांना मनस्ताप होत आहे. या प्रकारावर आळा घालून या भागात नजर ठेवण्यात यावी, तसेच पार्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव तालुका रयत संघटना तसेच या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्यावतीने करण्यात आली आहे.