राज्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पडली असून ३० डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. बेळगाव तालुक्यातील मतमोजणी प्रक्रिया बी. के. मॉडेल या शाळेत करण्यात आली असून या शाळेत स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्ट्रॉंग रुमभोवती २४ तास सुमारे २५ पोलिसांचा खडा पहारा तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण ५५ ग्रामपंचायतींसाठी ७९.४४ टक्के (२ लाख ५७ हजार ६४) मतदान झाले असून ९६४ जागांसाठी ३००५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून ३० डिसेंबर रोजी तीन टप्प्यात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
या प्रक्रियेत सकाळी ८ ते ११ यावेळेत अंकलगी, होनगा, धरनट्टी, बस्तवाड, कलखांब, तुम्मरगुद्दी, अगसगा, हिरेबागेवाडी, हिंडलगा, कुकडोळ्ळी, अष्टे, हंदिगनूर, मास्तमर्डी, सुळगा (हिंडलगा), तुरमुरी, मुतगा, कुद्रेमानी, मंडोळी, कंग्राळी बी. के., बाळेकुंद्री खुर्द या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत संतीबस्तवाड, न्यू वंटमुरी, हलगा, मुचंडी, सांबरा, तारिहाळ, उचगाव, कडोली, अरळीकट्टी, हुदली, केदनूर, सुळेभावी, बाळेकुंद्री बी. के., बेनकनहळ्ळी, निलजी, बंबरगा या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मारिहाळ, केके कोप्प, बेक्किनकेरे, बेळगुंदी, मोदगा, देसूर, बडस खुर्द, येळ्ळूर, काकती, सुळगा (येळ्ळूर), नंदिहळ्ळी, कंग्राळी खुर्द, किणये, धामणे (एस), करडीगुद्दी, वाघवडे, मार्कंडेयनगर, मुत्नाळ, भेंडिगेरी या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत.
मतमोजणी केंद्रात चार खोल्यांमध्ये मतपेट्या सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या असून ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेत तीन टप्प्यात मतमोजणी करण्यात येणार आहे. ठराविक वेळ ठरवून देण्यात आली असली तरी सायंकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निकालाकडे साऱ्या तालुक्याच्या नजरा खिळल्या आहेत.