सिद्धरामय्या हे विक्षिप्त पद्धतीचे व्यक्तिमत्व असल्याचा आरोप ग्रामविकास व पंचायत राजमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केला आहे. आज बेळगावमध्ये भाजप कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सिद्धरामय्यांना टोला लगावला आहे.
सिद्धरामय्या हे प्रत्येक नेत्याचा एकेरीत उल्लेख करतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ सिद्धरामय्या हे केवळ आरोप करण्यातच आपला वेळ घालवतात. नलिनकुमार कटील, बी. एस. येडियुराप्पा, इतकेच नाही तर पंतप्रधानांचाही ते एकेरीत उल्लेख करतात. तर मग आम्ही त्यांचा उल्लेख एकेरीत का करू नये? त्यांच्याप्रमाणेच आम्हीही सिद्धरामय्या यांना एकेरीत बोलवू, अशी भूमिका ईश्वरप्पा यांनी मांडली.
बेळगावमध्ये हॉटेल यु. के. २७ येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या सुरुवातीला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, कि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के जागा मिळविण्याचा आमचा उद्देश असून यासाठी संपूर्णपणे तयारी करण्यात येत आहे.
यासोबतच पक्ष संघटना, ग्रामीण भागाचा विकास, पंचायत निवडणूक, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शिवमोगा येथे झालेल्या दंगलीबाबत बोलताना ते म्हणाले कि, हा प्रकार पूर्वनियोजित असून मुस्लिम समाजातील गुंडांच्या माध्यमातून हि दंगल घडविण्यात आली आहे. गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला असून यातून ही दंगल झाल्याचे त्यांनी सांगितले.