बेळगावमधील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर येथे आज दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी होणाऱ्या सोमवती अमावस्येच्या पूर्वसंध्येला कपिलेश्वर मंदिरात लाखो दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता.
यावेळी लेझर शोचेही आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसर दिव्यांनी आणि फुलांनी आकर्षकरित्या सजविण्यात आला होता. मंदिराच्या चोहोबाजूंनी फुलांच्या रांगोळ्यांनी मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला होता.
मागील पंधरवड्यात वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उत्तर काशी येथील काशी विश्वनाथाच्या मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
याची प्रतिकृती म्हणून आज बेळगावमधील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात उत्तर काशीचे स्वरूप देण्यात आले होते.
कपिलेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक आरास करण्यात आली होती. श्रींची लोणीस्वरूपातील विशेष पूजा करण्यात आली होती.
या पूजेचे पौरोहित्य सचिन आनंदाचे यांनी केले. सायंकाळी अनेक भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. या दीपोत्सवात मंदिर ट्रस्ट कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि भाविक सहभागी झाले होते.