विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील हजेरी वाढावी यासाठी पुढील वर्षापासून राज्यातील सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये यापूर्वीच बायोमेट्रिक हजेरी सक्तीची झाली आहे. आता पुढील वर्षापासून सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी भरावी लागणार आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधील अनियमितपणा कमी व्हावा आणि त्यांना शिस्त लागावी, यासाठी सरकारने राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कांही प्रमाणात शिस्त लागल्याचे दिसून आले आहे. आता पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार आहे. कारण अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी फक्त प्रॅक्टिकल्सना उपस्थित राहतात आणि नियमित वर्गांना दांडी मारतात असे दिसून आले आहे.
विद्यार्थ्यांच्या गैरहजेरी बाबत पालकांना कल्पना देऊन देखील त्याचा काहीच परिणाम होत नाही. परिणामी 75 टक्क्याची हजेरी कमी पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येत नाही. यासाठी महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्याचा विचार पुढे आला आहे. सरकारकडून सरकारी महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र खासगी शिक्षण संस्थांच्या महाविद्यालयांना सरकारकडून कोणतीही अनुदान मिळणार नसल्यामुळे त्यांना स्वखर्चाने बायोमेट्रिक मशीन बसवावे लागणार आहे.