कर्नाटक परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी आज बंगळूरमध्ये संप पुकारला असून या बंदला आज बेळगाव विभाग परिवहनने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आज सकाळपासून बेळगावमधील बस सेवा ठप्प झाली आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळण्यासाठी हा संप पुकारला असून यासंदर्भात आज बंगळूर येथे आंदोलन करण्यात येत आहे
आज सकाळी बेळगाव शहरातील बससेवा ठप्प झाली असून अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आज बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या परीक्षा असून या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पुकारण्यात आलेल्या या बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. परिवहनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या संपला पाठिंबा दिला असून आज बेळगावमधील डेपो कर्मचारीही कामावर हजार झाले नाहीत.
बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकावरील हजारो कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळविण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा-सुविधा मिळाव्यात अशी मागणी परिवहन कर्मचाऱ्यांनी केली आहे. आज पुकारण्यात आलेल्या या संपामुळे बेळगाव शहर बससेवा तसेच बेळगावमधून परगावी असणारी बससेवा ठप्प झाली आहे.