हॉटेल यु के २७ येथे भाजप कोअर कमिटीची बैठक सुरु झाली असून या बैठकीत १४ सदस्यांपैकी १० सदस्यांनी सहभाग घेतला आहे. ही बैठक शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसीय सत्रात पार पडणार असून उच्चस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
आज पहिल्या दिवशी पार पडलेल्या बैठकीत नलिनकुमार कटील, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, अरुण सिंग, प्रल्हाद जोशी, जगदीश शेट्टर, गोविंद कारजोळ, सीटी रवी, अरविंद लिंबावळी, आर. अशोक, के. एस. ईश्वरप्पा यांचा या सभेत सहभाग दिसून आला. माजी मुख्यमंत्री सदानंद गौड, उदासी यांच्यासह एकूण चार जण कोअर कमिटीच्या बैठकीत अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
भाजप राज्य प्रभारी अरुण सिंग यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, कार्यकारिणी पुनर्रचना यासंबंधित महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप हायकमांडकडून अरुण सिंग यांनी कोणते आदेश कर्नाटक भाजपाला दिले आहेत? उमेदवारी कोणाला द्यायचे निश्चित झाले आहे? मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार आहे? यासंबंधी सर्व आदेश कर्नाटक भाजप कार्यकारिणीला देण्यात आले आहेत. या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील एकही सदस्यांचा समावेश नव्हता, हे विशेष!
यानंतर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत शनिवारच्या सत्रात महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा तसेच लव्ह जिहाद याविषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आजच्या सत्रात कोणतीही चर्चा करण्यात आली नसून उद्याच्या सत्रातही याबाबत चर्चा होणार नाही, अशी स्पष्टोक्ती अरविंद लिंबावळी यांनी दिली आहे. याशिवाय मुख्यमंत्री खुर्ची बदलाबाबत बोलताना ते म्हणाले कि, हा निर्णय सर्वस्वी हायकमांडचा असून मुख्यमंत्रिपदी बी. एस. येडियुराप्पा हेच राहतील असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.