कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेळगावच्या माजी डीसीपी सीमा लाटकर यांना बेळगावच्या दहाव्या वरिष्ठ जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
शहरातील गांधीनगर परिसरातील रहिवासी मलिकजान पठाण आणि त्याच्या नातेवाईकांची एका मालमत्तेच्या खटला प्रकरणी सीआरपीसी कलम १०७ अन्वये तत्कालीन डीसीपी सीमा लाटकर यांनी चौकशी केली होती. या प्रकरण संबंधी सीमा लाटकर यांनी मलिक जान याना मागील ६ जून रोजी नोटीस जारी केली होती. याप्रकरणी मलिकजान याने प्रश्न उपस्थित करून न्यायालयात धाव घेतली.
सीमा लाटकर यांनी जारी केलेल्या नोटिसीवर बेळगाव न्यायालयाने २९ जून रोजी स्थगिती आणली होती. या आदेशाची प्रत मलिक जान याने कमिशनर कार्यालयात सादर केली. ९ ऑकटोबर रोजी सीमा लाटकर यांनी या खटल्याच्या चौकशीसाठी पुन्हा नोटीस बजावली.
स्थगिती असूनही पुन्हा नोटीस बजावण्याचे कारण काय? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला असून यासंबंधी विचारणा करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी सीमा लाटकर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत. शिवाय दहावे वरिष्ठ जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीश हेमंत यांनी आयपीएस अधिकारी सीमा लाटकर यांना करणे दाखवा नोटीस जारी केली आहे.