स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील रेल्वे स्टेशन बस स्टँड अर्थात गोवा बस स्थानकाचे 2.26 कोटी रुपये खर्चून आधुनिक बसस्थानकामध्ये परिवर्तन केले जाणार आहे. या आधुनिक बस स्थानक प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आज मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील गोवा बस स्थानकाच्या आवारात आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड अनिल बेनके उपस्थित होते. बस स्थानक आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, सीबीटी बसस्थानकाप्रमाणे प्रकल्पाचे काम रखडवत न ठेवता गोवा बसस्थानकाच्या या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. बेळगांवच्या आसपासच्या खेड्यातील लोकांसाठी हे बसस्थानक सोयीची असल्यामुळे प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करून हे बस स्थानक जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे. जनतेनेही या कामी सहकार्य करावे. कंत्राटदाराकडून दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी जनतेची आहे. कांही समस्या असल्यास त्यांनी त्या कंत्राटदाराशी चर्चा करून दूर कराव्यात, असे आवाहन देखील आमदार बेनके यांनी केले.
बेळगांव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बर्चस्वा यांनी बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडने कॅन्टोन्मेंट हद्दीतील गोवा बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव मांडताच आम्ही तो तात्काळ मंजूर केला. कारण नव्या आधुनिक बसस्थानकात प्रवाशांसाठी सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. येत्या सुमारे 9 महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आधुनिक स्थानकाच्या देखभालीची जबाबदारी बेळगांव कँटोन्मेंट बोर्डकडे सोपविले जाणार आहे, अशी माहिती सीईओ बर्चस्वा यांनी दिली.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांनी उपस्थित अन्य सदस्यांच्यावतीने आपले मनोगत व्यक्त केले. गोवा बसस्थानक येथे आधुनिक बस स्थानकात रूपांतर केले जाणार आहे ही आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कारण सीबीटी बस स्थानका इतकेच बेळगांव रेल्वे स्थानकासमोरील हे गोवा बस स्थानक महत्त्वाचे आहे. विशेष करून रेल्वे स्थानकापासून तीन-चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सीबीटी बस स्थानकापेक्षा बेळगावच्या आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी हे बसस्थानक अत्यंत सोयीचे आहे.
आता या ठिकाणची जुनी इमारत आणि दुकाने जाऊन आधुनिक बस स्थानक उभारण्यात येणार असल्यामुळे परिसराचा कायापालट होणार आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत, असे साजिद शेख म्हणाले. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा सौ. निरंजना अष्टेकर, सदस्य रिझवान बेपारी, अलाउद्दीन किल्लेदार, मदन डोंगरे विक्रम पुरोहित, अरेबिया धारवाडकर, कॅन्टोन्मेंट ऑफिसचे अधिक्षक एम वाय टाळूकर, सतीश मन्नूकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, बेळगांव रेल्वे स्थानकासमोरील गोवा बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे 2.26 कोटी रुपये खर्च येणार आहे. बस स्थानकाच्या आधुनिक इमारतीमध्ये पाथ वे, प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छतागृह आधी सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत स्मार्ट सिटी अंतर्गत गोवा बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या प्रकल्पाच्या कामाला येत्या 7 ऑक्टोबर 2020 रोजी प्रारंभ होणार असून पुढील वर्षी 8 जुलै 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.