कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या लॉक डाऊनमुळे बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करणारे बेळगांवचे जलतरण प्रशिक्षक भरत कल्लाप्पा पाटील यांच्या मदतीला धावून गेलेल्या बापट गल्ली येथील श्री कालिकादेवी युवक मंडळाने त्यांना आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या लॉक डाऊनमुळे अनेकांना बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. लॉक डाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद पडले आहेत. त्याला स्विमिंग पूल अर्थात जलतरण तलावाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी देखील अपवाद नाहीत
या कर्मचाऱ्यांपैकी जलतरण प्रशिक्षक भरत कल्लाप्पा पाटील हे एक होत. जलतरण तलाव बंद करण्यात आल्यामुळे रोजगार बंद होऊन भरत पाटील आर्थिक विवंचनेत पडले आहेत. याची माहिती मिळताच बापट गल्ली येथील श्री कालिकादेवी युवक मंडळ त्यांच्या मदतीस धावले आणि त्यांनी त्यांना रोख मदत देऊ केली.
श्री कालिका युवक मंडळ असेच गरजू दुर्लक्षित व्यक्तींसह खेळाडू आणि हुशार विद्यार्थ्यांना वेळोवेळी आर्थीक सहकार्य करत असते. आपला हा वारसा जपत यावेळी त्यांनी भरत पाटील यांना आर्थिक सहाय्य करून सहकार्य केले.
यावेळी गल्लीतील अनेक कार्यकर्ते हजर होते. लॉक डाऊनमुळे बिकट परिस्थिती ओढवलेल्या लोकांसाठी प्रत्येक मंडळाने पुढाकार घेऊन आपल्यापरीने थोडीफार मदत करावी, असे आवाहन श्री कालिकादेवी युवक मंडळाने केले आहे.