हॉस्पिटलमधील वैद्यकीय उपचाराचे बिल भरण्यास असमर्थ असलेल्या या एका मध्यमवर्गीय असहाय्य कुटुंबाला फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी मदतीचा हात देऊन त्यांची आर्थिक कोंडी सोडविण्याची घटना नुकतीच घडली.
याबाबतची माहिती अशी की, केळकर बाग येथील रहिवासी उर्मिला शंकर मुतकेकर यांना गेल्या सहा दिवसांपासून केएलई हाॅस्पिटल वडगांव येथे दाखल करण्यात आले आहे. आहेत. यकृताचा आजार असलेल्या उर्मिला मुतकेकर या मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. उर्मिला यांचे पती कॅम्प येथील एका फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफरचे काम करतात.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुतकेकर यांना आपली पत्नी उर्मिला हिचे सुमारे 10,000 रुपये इतके हाॅस्पिटलचे बिल भरणे कठीण झाले होते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये चिंताग्रस्त स्थितीत बसलेल्या उर्मिला यांच्या पती आणि मुलीकडून त्यांच्या चिंतेचे कारण विकास प्रभू यांच्याद्वारे फेसबूक फ्रेंड्स सर्कलला कळाले. तेंव्हा फेसबुक फ्रेंडस सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी तात्काळ धावाधाव करून पैसे जमा केले आणि हॉस्पिटलचे संपूर्ण थकीत बिल भरले.
हॉस्पिटल बिलासाठी स्वतः संतोष दरेकर यांच्यासह कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, सिद्धभैरव सोसायटी पाटील गल्लीचे चेअरमन रणजीत पाटील, राजू काकती, मनोज मत्तिकोप आदींनी मदत केली.
उर्मिला यांना येथून पुढचे दोन दिवस केएलई हॉस्पिटलमध्येच रहावे लागणार आहे. तसेच दरमहा त्यांना या हॉस्पिटलमध्ये जाणे भाग आहे. त्यामुळे येथून पुढचा खर्च देखील त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी 7795465177 या क्रमांकावर संपर्क साधून अथवा फोन पे करून मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.