सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटलमधील नूतन ओबीजी विभाग आणि 90 बेड्सच्या सुसज्जित पीडियाट्रिक (बालरोग शत्रक्रिया) विभागाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आज सकाळी उत्साहात पार पडला.
बेळगांव जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत, बेळगांव वैद्यकीय विज्ञान संस्था, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि इंजीनियरिंग विभागाच्यावतीने बीम्स हॉस्पिटलच्या प्रांगणातील प्रसूती वॉर्डच्या पहिल्या मजल्यावर आयोजित या समारंभास उद्घाटक म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके हे होते.
बिम्समधील या नूतन सुविधांचा शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री के. सुधारकर म्हणाले की, सरकारकडून आता जानेवारीपासून या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सिटीस्कॅन रक्त, तपासणी आदी सर्व कांही मोफत केले जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये पेपरलेस कामकाज करण्यात येणार आहे. कोणत्याही औषधांची गरज भासल्यास सरकारकडूनच त्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव मध्ये 7 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या 350 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या आधारे लवकरच याठिकाणी पीएचसी सुरू करण्यात येतील ऍम्ब्युलन्स सेवा मजबूत केली जाईल असे सांगून जर स्वतःहून चांगले काम केले गेले तर खाजगी हॉस्पिटल पेक्षाही उत्तम वैद्यकीय सेवा या ठिकाणी मिळू शकेल असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, महापालिका आयुक्त जगदीश के एच., बीम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, मुख्य प्रशासन अधिकारी सईदा आफ्रीना बानु, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आदी उपस्थित होते.