Monday, May 6, 2024

/

एपीएमसीमधील बाजार दोन वेळेत भरवावा : व्यापाऱ्यांची मागणी

 belgaum

लॉकडाऊन काळात बेळगाव एपीएमसीमधील व्यवहार काही अंशी बंद करण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेत आणि गैरसोय टाळण्यासाठी नियमावलीनुसार सकाळच्या वेळेत बाजार सुरु करण्यात आला होता.

स्थानिक लिलाव तसेच बेळगावहून इतर ठिकाणी पाठविण्यात येणाऱ्या मालालाही परवानगी मिळाली. परंतु सध्या सकाळी एकाच वेळेत बाजार भरविण्यात येत असल्यामुळे व्यापारी वर्गाची तारांबळ होत आहे. पर्यायाने सकाळी खरेदी करण्यात आलेला माल संध्याकाळपर्यंत खराब होत आहे. यामुळे एपीएमसीमधील बाजार पूर्वीप्रमाणेच सकाळी आणि संध्याकाळीही भरविण्यात यावा, याबद्दल व्यापाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

बेळगाव एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. त्यांनतर स्थानिक बाजारासह परगावीही येथून भाजी विक्रीसाठी पाठविण्यात येते. लॉकडाऊनच्या काळात केवळ एकाच वेळेत हा बाजार भरविण्यात येत होता. सध्या देशभरात अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असून सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत. त्यामुळे एपीएमसी मधील व्यवहारही पूर्ववत सुरु व्हावेत, अशी मागणी होत आहे. एपीएमसीमधील सकाळचा बाजार हा साधारण ६ वाजता भरतो.

 belgaum

यादरम्यान बाहेरून आलेला भाजीपाला खरेदी करण्यात येतो. हे व्यवहार केवळ सकाळी एकाच वेळेपुरते मर्यादित असल्यामुळे सायंकाळपर्यंत हा भाजीपाला खराब होत आहे. आधीच भाज्यांचे दर खाली पडले आहेत. अशातच सकाळी खरेदी केलेला भाजीपाला संध्याकाळपर्यंत ठेवल्यामुळे तो खराब होत आहे आणि भाजीपाल्याला दरही योग्य मिळत नाही. बेळगावहून गोव्याला मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठविण्यात येतो.

लॉकडाऊनच्या पूर्वी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला भाजीपाल्याचा लिलाव होत असे. परंतु लॉकडाऊननंतर हा लिलाव एकाच वेळेत होत असल्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. यामुळे एपीएमसी प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच दोन्ही वेळ बाजार भरवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी चर्चा व्यापारी वर्गातून होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.