बहुचर्चित बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका नुकत्याच पार पड्ल्या असून आज दीपावलीच्या मुहूर्तावर १४ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली.
या निवडणुकीसाठी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार असून दुपारी ३ वाजता संचालक मंडळाची सभा सुरु होणार आहे. नामनिर्देशन पात्र माघार घेण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.
भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि या निवडणूक बिनविरोध पार पडतील, अशी आशा व्यक्त केली. अध्यक्ष – उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदासाठी पुन्हा रमेश कत्ती यांचे नाव चर्चेत होते. परंतु काही संचालकांनी कत्तींना तीव्र विरोध दर्शविला. रमेश जारकीहोळी यांचेही नाव चर्चेत होते. परंतु बैठकीतून कामानिमित्त बाहेर जायचे असल्याचे सांगून जारकीहोळी बैठकीतून बाहेर आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाची निवडणूक न होता बिनविरोध निवडणूक होण्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर एका खासगी हॉटेल मध्ये बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले कि, डीसीसी बँकेची निवडणूक हि बिनविरोधच पार पडेल. सर्व नेते एकजुटीने उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी, माजी मंत्री उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी, उपसभापती आनंद मामनी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, विधान परिषदेचे सदस्य महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.
आज सकाळी ११ पर्यंत या सर्व गोष्टींवर पडदा पडून निश्चितपणाने डीसीसी बँकेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात येतील. डीसीसी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदी अनेकांची नावे चर्चेत आहेत. परंतु हि निवडणूक बिनविरोध पार पडते कि यातही कोणते राजकारण आड येते, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधून आहे.