बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. या विकासकामांतर्गत संगोळी रायन्ना सर्कल (आरटीओ सर्कल) पासून कृष्णदेवराय सर्कल (कोल्हापूर सर्कल) पर्यंत रस्त्याचे कामकाज सुरु आहे. याठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे रहदारीला अडथळा होत आहे.
याठिकाणी अनेक हॉटेल्स, शोरूम्स, वाहन गॅरेज, शॉपिंग मॉल्स, सुरमार्केट्स आहेत. येथे येणारे नागरिक तसेच कामगार वाटेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करत आहेत. यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच बसेस, ट्रक, टिप्पर आदी वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात या मार्गावरून होत असून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. येथून जवळच महानगरपालिका, आयपीजी उत्तर वलय, आणि जिल्हा वरिष्ठाधिकाऱ्यांची, पोलीस आयुक्तांची कार्यालयेही आहेत.
त्यासोबतच कुमार गन्धर्व रंगमंदिर आणि इतर मुख्य कार्यालयेही याच मार्गावर आहेत. दिवसेंदिवस या मार्गावर नागरिकांची संख्या वाढत आहे. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्यावतीनेही वाटेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. दुसऱ्या बाजूला केएलई सारखे मोठे इस्पितळही आहे. या इस्पितळात दिवसरात्र रुग्णवाहिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असते.
या सर्व गोष्टींचा विचार करून रहदारीला कोणताही अडथळा होऊ नये आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने संगोळी रायन्ना सकाळ ते कृष्णदेवराय सर्कल पर्यंतच्या मार्गावर ‘नो पार्किंग झोन’ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या संदर्भात नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना करावयाची असल्यास आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांकासह लेखी अथवा समक्ष भेटून किंवा [email protected] या ईमेल आयडीवर पोलीस आयुक्तालयांच्या कचेरीत कळवायचे आहे.