सर्व्हे ऑफ इंडिया आणि पंचायत राज्य खात्याच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात मालमत्ता कार्ड वितरण करण्याची महत्त्वाकांक्षी “स्वामित्व” योजना प्रायोगिक टप्प्यात बेळगांवसह एकूण पांच जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली जात आहे.
प्रायोगिक टप्प्यात बेळगांवसह रामनगर, म्हैसूर, हासन आणि तुमकुर या पांच जिल्ह्यांमध्ये लवकरच स्वामित्व योजना सुरू केली जाणार आहे. राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी ही माहिती दिली आहे. बेळगांव, रामनगर, तुमकुर, म्हैसूर व हासन या पाच जिल्ह्यातील 10 ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील 83 खेड्यांमध्ये स्वामित्व योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून 773 मालमत्ताधारकांना मालमत्ता कार्डे वितरित करण्यात येणार आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर ही योजना यशस्वी झाल्यास पहिल्या टप्प्यात बेळगांव, विजापूर, मंगळूर, दावणगेरे, धारवाड, गदग, गुलबर्गा, हासन, कोडगु, कोप्पळ, म्हैसूर, रायचूर, तुमकुर, रामनगर, कारवार व यादगिरी या जिल्ह्यांमध्ये पूर्ण प्रमाणात ही योजना जारी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 16,600 खेड्यांमध्ये मार्च 2020 पर्यंत स्वामित्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आलेले आहे, या योजनेचा दुसरा टप्पा एप्रिल 2021 नंतर सुरू होणार आहे.