सुळगा -हिंडलगा गावानजीक रस्त्यावर पडलेले धोकादायक खड्डे सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी श्रमदानाने बुजविले. यामुळे वाहन चालकात विशेष करून दुचाकी वाहन चालकात समाधान व्यक्त होत आहे.
सुळगा -हिंडलगा गावानजीक रस्त्याची अलीकडे पार दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने नादुरुस्त होण्याबरोबरच याठिकाणी अपघाताच्या घटना घडत होत्या. सदर रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे काल बुधवारी रात्री दोघा मोटरसायकल स्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले होते.
या घटनेची गंभीर दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते विनायक तुप्पट व ग्रा. पं. सदस्य भागण्णा नरोटी यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी संबंधित धोकादायक खड्डे खडी टाकून श्रमदानाने बुजविण्यात आले.
तसेच रोड रोलरच्या साह्याने रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले. या कामासाठी ग्रा. पं. सदस्य नरोटे यांनी स्वखर्चाने एक ट्रॅक्टर खडी मागविले होती,
तर सरकारी कंत्राटदार शशिकांत पाटील यांनी आपल्याकडील जेसीबी व रोड रोलर विनामूल्य वापरण्यास दिले होते. रस्त्यावरील खड्डे दुरुस्त झाल्यामुळे विशेष करून दुचाकी वाहन चालकात समाधान व्यक्त होत आहे.