कंत्राटी तत्त्वावरील आणि विना कंत्राटी तत्त्वावरील कामगारांना त्यांच्या कार्याबद्दल केवळ टाळ्या नको तर सुविधाही पुरविण्यात याव्या, आणि कायमच्या नोकरीची हमी मिळावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरत अनिश्चित काळासाठी आंदोलन छेडले. या आंदोलनाद्वारे त्यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन छेडलेल्या कर्मचाऱ्यांनी सामान कामासाठी समान वेतन मिळावे, कोरोना वॉरियर्सना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा, आरोग्य क्षेत्रासाठी बजेटमध्ये वाढ करण्यात यावी, आउटसोर्स बेसिस वर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे,
वेतन आणि नोकरीची हमी, सध्या असलेल्या पदावर कायम करणे, हरियाणा मॉडेल प्रमाणे सर्वसमावेशक धोरण तयार करणे, वैद्यकीय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना समान वेतन लागू करणे आणि मध्यस्थींशिवाय थेट काम आणि थेट वेतन देण्याची सोय करणे अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या निवेदनाद्वारे एकूण १४ मागण्या करण्यात आल्या असून कोरोना काळात दिवसरात्र सेवा करणाऱ्या कोरोना वॉरियर्सना सुविधा मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. सरकार आणि जनता आमचा सन्मान करते परंतु आपला जीव धोक्यात घालून करण्यात येत असलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
सरकारकडे गेली २ वर्षे सातत्याने आम्ही निवेदने देऊन मागणी करत आहोत परंतु सरकार याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी आपण संप पुकारल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.