निधन पावलेल्या आपल्या आईला पुरोगामी विचारसरणीच्या आपल्या एकुलत्या एक भावाच्या इच्छेखातर पांच बहिणींनी खांदा देऊन अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडल्याची घटना येळ्ळूर (ता. बेळगांव) येथे सोमवारी घडली.
येळ्ळूर (ता. बेळगांव) येथील सौ.अनुसया निंगाप्पा मोटराचे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती निंगाप्पा मोटराचे सर आणि पाच मुलींसोबत एक मुलगा असा परिवार असला तरी पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या परशराम मोटराचे या भावाच्या इच्छेखातर मुलींनी पुढाकार घेत आईच्या पार्थिवाला खांदा देत सर्व विधी पार पाडले.
याप्रसंगी मुलींनी अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार पार पाडत आईच्या पार्थिवाला खांदा दिला. अंत्यसंस्कारावेळी परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
कै. सौ. अनुसया यांच्या पार्थिवाला खांदा देत जयश्री बाळाराम पाखरे (वडगांव), सरस्वती शिवाजी जाधव (येळ्ळूर), वसुंधरा गणपत पाटील (बाची), मुक्ता रमेश सुजे (यमकणमर्डी), डॉ.सरिता (मधुरा) राम गुरव (कुद्रेमानी) या पांच बहिणींनी आपल्या आईला अखेरचा निरोप दिला.
दिवंगत अनुसया यांना मुलगा जरी असला तरी मुलींनी खांदा दिल्याने “वंशाचा दिवा मुलगाच” हा अट्टहास आता मागे पडत आहे, असेच यावेळी म्हणावे लागेल. पार्थिवासमोर सूप धरून जायच्या प्रथेलासुद्धा या ठिकाणी फाटा देण्यात आला. या पुरोगामी व कांहीशा धाडसी पावलाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.