बेळगांवच्या सिटीझन्स कौन्सिल फोरमने पाठपुरावा केल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली बेळगाव -मुंबई रेल्वे सेवा येत्या 20 ऑक्टोबरपासून पुनश्च सुरू होणार आहे. परिणामी आता प्रवाशांना बेळगांव ते मुंबई प्रवास करणे पुन्हा शक्य होणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 6 महिन्यांपासून बेळगांव -मुंबई रेल्वे सेवा बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते मात्र आता निवृत्त रेल्वेने फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन अर्थात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल रेल्वेंपैकी 06505/06 केएसआर बेंगलोर ते गांधीधाम साप्ताहिक रेल्वे, 06209/10 म्हैसूर ते अजमेर द्वीसाप्ताहिक रेल्वे आणि 07317/18 हुबळी ते एलटीटी रेल्वे (दररोज) अशा तीन रेल्वे येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. केएसआर बेंगलोर ते गांधीधाम साप्ताहिक रेल्वे दर रविवारी सकाळी 09:35 वाजता बेळगांवहून सुटणार आहे. त्याचप्रमाणे म्हैसूर ते अजमेर द्वीसाप्ताहिक रेल्वे दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 09:35 वाजता आणि हुबळी ते एलटीटी रेल्वे दररोज सायंकाळी 06:35 वाजता बेळगांव रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करेल.
देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईला मागील 6 महिन्यांपासून बेळगाव मधून रेल्वे बंद होती. रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांना एक तर पुणे येथून दुसऱ्या रेल्वे मुंबई गाठावी लागत होती, अथवा आराम बसने अधिक पैसे देऊन असुरक्षित पुणे मुंबईचा प्रवास करावा लागत होता.
लॉक डाऊनपासून गावी न परतलेल्या चाकरमान्यांना दिवाळीला गावी येण्याची आस लागली होती. आता बेळगांव -मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार असल्यामुळे सिटिझन्स कौन्सिल फोरम बेळगांवचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी दिवाळीपूर्वी फोरमच्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.