आसपासची जवळपास सर्व दुकाने बंद असल्यामुळे एखाद्याने “काका मंगळवार सुट्टी नाही का?” असे विचारले की, कोरोना महामारीमुळे पांच महिने घरात बसलो आहे. त्यामुळे आता मला एक दिवस ही सुट्टी घेऊन चालणार नाही, मी सुट्टी घेतली तर घर कसं चालायचं? असे त्यांचे उत्तर असते. हे आहेत शेरीगल्ली जैन मंदिरासमोर शनि मंदिरानजीक चविष्ट अलिपाक विकणारे 72 वर्षीय आलिपाकवाले काका.
शहरातील बहुदा सर्वोत्तम “अलीपाक” तयार करणाऱ्या या काकांकडे तो तयार करताना कंजुषी अजिबात पहावयास मिळत नाही. मुक्तहस्ताने शेंगदाणे, सुके खोबरे, रवाळ पीठ, आले, कढीपत्ता व दोन अलिपाक लाडू हे साहित्य मिसळून ते अगदी परिपूर्ण अलिपाक बनवतात.
काका आवश्यक साहित्य पोह्यात मिसळून जेंव्हा दोन लाडू त्यात फोडून वर लिंबू पिळतात, तेंव्हा पाहणाऱ्याच्या तोंडाला हमखास पाणी सुटते. ही अतिशयोक्ती नाही, खरंतर शहरातील प्रत्येक अलीपाकप्रेमींने एकदा तरी या काकांकडील अलीपाकची चव चाखायलाच हवी. दररोज सकाळपासून काका तयारीला लागतात आणि दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत आपल्या हातगाडीच्या ठेल्यावर आलिपाकची विक्री करतात.
वयाच्या 72 व्या वर्षी अलीपाक विक्री करण्याचे या काकांचे काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. ग्राहकांशी असलेल्या त्यांच्या मैत्रीपूर्ण वागणुकीमुळे ते शेरीगल्ली -शनी मंदिर परिसरात लोकप्रिय आहेत.
अलीपाक विक्री हे त्यांच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. उतारवयात कोणासमोर हात न पसरता स्वाभिमानाने काम करणाऱ्या या अलीपाकवाल्या काकांच्या ठेल्याला एकदातरी भेट देऊन बेळगांवकरांनी त्यांना आधार दिला पाहिजे, असे मत त्यांच्या ग्राहकांमध्ये व्यक्त होताना दिसत असते.