अखिल भारतीय शिक्षण सेवा समिती, बेळगावच्या वतीने स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांना बेळगाव भूषण समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. बेळगाव मधील या अवलियाशी ‘बेळगाव लाईव्ह’ ने संवाद साधला आहे. बेळगावमध्ये स्केटिंग सारख्या खेळात अनेक खेळाडूंना घडविण्याचे योगदान देणाऱ्या सूर्यकांत हिंडलगेकर यांच्याविषयी जाणून घेऊयात…
आपले शरीर लवचिक राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक खेळ म्हणजे स्केटिंग. मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच स्केटिंगचे आकर्षण असते. पायाला चाकं लावून भन्नाट वेगाने पुढे जाणे, असे त्यांना वाटत असते. पण, या खेळाचेही एक शास्त्र आहे, काही नियम आहेत, हे त्यांना माहिती नसते. स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्णरित्या खेळला जाणारा खेळ आहे. शरीराची लवचिकता वाढविणारा हा खेळ असून यामध्ये मान, हात, पाय लवचिक होतात. त्यामुळे शरीराचा सर्वांग व्यायाम होतो. या खेळाचे संपूर्ण प्रशिक्षण बेळगावमधील सूर्यकांत हिंडलगेकर यांच्यामार्फ़त देण्यात येते.
नुकतेच सूर्यकांत हिंडलगेकर यांना अखिल भारतीय शिक्षण सेवा समिती, बेळगावच्या वतीने २०२० सालच्या बेळगाव भूषण समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. सूर्यकांत हिंडलगेकर हे गेली २५ वर्षे या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक खेळाडूंना घडविले आहे. ३.५ वर्षांच्या लहानग्यांपासून ते अगदी पंचविशी तिशीपर्यंतच्या तरुणांना त्यांनी या खेळासाठी तयार केलं आहे. यांच्या प्रशिक्षणांतर्गत तयार झालेले अनेक स्केटिंगपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
केवळ स्थानिक किंवा राज्यस्तरीयच नाही राष्ट्रीय पातळीवरही हिंडलगेकर यांनी प्रशिक्षण दिलेले विद्यार्थी चमकले आहेत. शिवाय अनेक पदक विजेतेही आहेत. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग स्पर्धेतही या खेळाडूंनी सहभाग दर्शविला आहे. याचप्रमाणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही खेळाडूंची नोंद झाली आहे. बेळगावचे नाव स्केटिंगमध्ये चमकावणारा आणि गिनीज बुक रेकॉर्डमध्ये आपली कामगिरी नोंदवणारा स्केटिंगपटू रोहन कोकणे हाही हिंडलगेकर यांच्याच अंतर्गत तयार झालेला खेळाडू आहे. त्याचप्रमाणे अभिषेक नावले हा स्केटिंगपटूही यांच्याच प्रशिक्षणतर्गत तयार झालेला खेळाडू आहे. रोहन कोकणे आणि अभिषेक नावले यांच्यासारख्या शेकडो स्केटिंगपटूंना सूर्यकांत हिंडलगेकर यांनी प्रशिक्षण दिले आहे.
बेळगावमध्ये कार्यरत असणाऱ्या बेलगाम रोलर स्केटिंग अकादमीमध्ये कार्यरत असणाऱ्या सूर्यकांत हिंडलगेकर यांनी अनेक गरजू, होतकरू खेळाडूंनाही मोफत प्रशिक्षण दिले आहे हे विशेष. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी भागात त्यांनी या गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षणाची सोय केली आहे. गेली २५ वर्षे सातत्याने या क्षेत्रात कार्यरत असणारे हिंडलगेकर यांनी आजपर्यंत अनेक पुरस्कार आणि गौरव प्राप्त केले आहेत. बेलगाम रोलर स्केटिंग अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी या अकादमीला २०१५ साली कर्नाटक राज्य पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. गोवावेस येथे जलतरण तलावाच्या छोट्या जागेत सुरु करण्यात आलेल्या हि अकादमी सध्या गणेशपूर रोडवरील गुड शेफर्ड स्कुलच्या प्रांगणात प्रशिक्षण देते. याठिकाणी २०० मीटर स्केटिंग रिंक असून अनेक स्केटिंगपटू सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत.
यासंदर्भात सूर्यकांत हिंडलगेकर म्हणाले कि, कोरोनासारख्या महाभयंकर रोगाशी सामना करण्यासाठी अजूनही लस उपलब्ध झाली नाही. परंतु याला पर्याय किंवा अशा रोगांशी लढण्यासाठी शरीराला व्यायाम महत्वाचा आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर कोणत्याही रोगाला घाबरण्याचे कारण नाही. शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि पोषक आहार हा उत्तम पर्याय आहे.
स्केटिंगचा खेळाडू हा ताशी ३० किलोमीटरच्या वेगाने सराव करत असतो. त्यामुळे एका तासात त्याच्या शरीरातील सहाशे कॅलरीज कमी होतात, फॅट कमी होतात. ३० मिनिटे स्केटिंग केल्यास हृदयाच्या ठोक्याचा दर एका मिनिटाला १४८ एवढा होतो. शरीरातील सर्व स्नायू बळकट होतात, शक्ती वाढते. धावण्यापेक्षा स्केटिंग केल्यास शरीराच्या हाडातील जॉइंट्सवरील ताण कमी होतो. नियमित सरावामुळे गुडघे व पायाची हाडे मजबूत होतात. पोटाचा व पाठीचाही व्यायाम होतो. स्केटिंग सराव करणाऱ्याचा दिवस आनंदित व चेतनाक्षम राहतो. संधिवात तसेच अन्य आजार असलेला व्यक्तीही स्केटिंगमुळे निरोगी व प्रफुल्लित होतो. लहान मुलांबरोबरच वयोवृद्धहि स्केटिंगचा सराव करू शकतो. हा खेळ लोकप्रिय आहे. स्केटर्स हा लांबचा पल्ला कमी वेळात गाठू शकतो. चढ किंवा उतार अगदी व्यवस्थित तोल सांभाळून पार करू शकतो.
या खेळासाठी प्रशिक्षण योग्य मिळाले तर हा खेळ खेळणे सोपे आहे. स्केटिंगच्या सरावासाठी दोनशे मीटरचा ट्रॅक लागतो. सरावाअगोदार फिटनेससाठी योगा, लेग स्टेचिंग, स्कीपिंग असे तणावमुक्त व्यायाम करण्याची गरज असते. स्केटिंगच्या स्टेप्स व्यवस्थित न केल्यास शरीराच्या मणक्यास इजा होण्याची शक्यता असते. स्केटिंगची गती वाढविण्यासाठी हाताची व पायाची हालचाल योग्य करावी. त्यासाठी आत्मविश्वास व चपळता या बाबी अंगीकारल्या पाहिजेत. हा सराव करताना हेल्मेट घालणे अत्यावश्यक आहे. आहारात सर्वप्रकारची फळे किंवा फळाचा रस सरावादरम्यान अथवा सरावानंतर घ्यावा. आहारात सलाडही असावे. स्केटिंगसंदर्भातील प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी नक्कीच आपल्याशी संपर्क साधावा तसेच समाजातील अनेक गरजू खेळाडूंना हा खेळ शिकण्याची इच्छा असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे
बेळगावमधील अनेक स्केटिंगपटू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. सूर्यकांत हिंडलगेकर यांच्यासारख्या प्रशिक्षकांमुळे बेळगावमध्ये हा खेळ उत्तमरीत्या खेळला जात असून या प्रकारच्या क्रीडा क्षेत्रात बेळगावचे नाव उंचावणाऱ्या सूर्यकांत हिंडलगेकर यांना ‘बेळगाव लाईव्ह’तर्फे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!