जात, धर्म, पंत आणि भाषेचे राजकारण करून आपण मराठा व मराठी क्रांती मोर्चात जाणार नाही असा काहीसा प्रचारही होताना दिसतोय. हा काय केवळ मराठी भाषिकांचा मोर्चा आहे असा समज इतर भाषिक मराठा समाजात पसरवून काहीजण उगाच आपले महत्व वाढवून घेऊ लागले आहेत . मोर्चात सीमाप्रश्नाची मागणी आल्याने मागे हटलेल्या या मंडळींनी मुसलमान बांधवांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
विविध मुस्लिम संघटनांनी या मोर्चासाठी एकत्र येऊन आपला पाठिंबा दिला आहे. फक्त हजेरी किंवा उपस्थिती पुरते मर्यादित न राहता उन्हात सहभागी होऊन तहानणाऱ्या मराठीजनांना पाणी,शरबत,पुरविण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली आहे. खरोखरच या मंडळींचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पर धर्म न मानता स्वतःचे योगदान देण्यासाठी ही माणसे सज्ज होत असताना भाषेच्या मुद्द्यावर असून बसलेल्या स्वधर्मीयांना काय म्हणावे हा प्रश्न निर्माण होतो.
सीमाभाग महाराष्ट्राचा असे म्हणणे कर्नाटकाच्या दृष्टीने राजद्रोह झालाय. त्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू आहे. हा भाग आपला असल्याचे सांगून महाराष्ट्राने सर्वोच्य न्यायालयात दावा दाखल केला आहे. यामुळे कर्नाटकाच्या आपल्या बाजूने होणाऱ्या कारवाया साहजिकच आहेत. या अनुसार जनशक्तीचा रेटा दाखवून देण्यासाठी मराठी भाषिक सज्ज होताहेत. याला इतर धर्मीय आणि जातीयही पाठिंबा देताहेत. गरज आहे ती इतर पक्ष्यांच्या दावणीला बांधलेल्या मंडळींनी मराठीसाठी एकत्र येण्याची. पक्ष्यांनी विरोध केला तर झिडकारून येण्याची. तसे न झाल्यास मराठी भाषिकांचे प्रतिनिधी म्हणवून घेण्याचा अधिकार त्यांना राहणार नाही.
पोलीस हे सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय पातळीवरील सूचना त्यांना पाळाव्याच लागतील. यामुळे पोलिसांवर राग व्यक्त न करता आपण कसे वागावे हे ज्याचे त्याने ठरविणेच उत्तम.