२२ ऑगष्ट रोजी होणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात शासनाने निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात मध्यवर्ती गणोशोत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱयांमार्फ़त सरकारला निवेदन सादर केले होते. त्यासोबतच पोलीस आयुक्तांनाही निवेदन सादर केले होते. परंतु अद्याप यासदंर्भात शासनाने कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही.
यंदाचा श्रीगणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत साधेपणात साजरा करण्याचा निर्णय सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी देखावे आणि इतर गोष्टींनाही फाटा देण्यात आला आहे. परंतु गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपला असून शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली नाही.
यामुळे मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. यासाठी शासनाने लवकरात लवकर धोरण जाहीर करावे आणि उत्सवाच्या पुढील कार्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाची मुहूर्तमेढ ही गोकुळाष्टमीच्या दिवशी रोवण्यात येते. मंगळवार दिनांक ११ ऑगष्ट रोजी गोकुळाष्टमी असून सार्वजनिक मंडळे पुढील कार्यासाठी थांबली आहेत. यामुळे या उत्सवासंदर्भात जी काही नियमावली आहे, ती लवकरात लवकर मंडळांना कळवावी असे निवेदन आज शहापूर मध्यवर्ती मंडळातर्फे पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.
यावेळी शहापूर विभागाचे कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सेक्रेटरी राजू सुतार, खजिनदार मंगेश नागोजीचे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, दिलीप दळवी, रावबहाद्दूर कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.