Thursday, December 19, 2024

/

हरवलेलं सोनं….

 belgaum

सुरेकरांच्या घरातलं आनंदाचं भरत सरतं ना सरतं तोच दुःखाचा उमाळा दाटून यावा, ही नीयतीची खेळी मानवी मनाला चटका लावणारी अशी..

बारावीत 91टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण झालेल्या सोनालीच्या पेपर मध्ये झळकलेल्या हसऱ्या छबीची शाई वाळते ना वाळते तोच तिच्या आत्महत्त्येच्या बातमीचे वृत्तपत्राचे रकाने भरून यावेत हा नियतीचा अजब न्याय!

मुलांच्या स्वप्नात पालकांची स्वप्ने कधी मिसळतात समजतच नाही. पालकांच्या राहून गेलेल्या आशा आकांक्षांना पालवी फुटते आणि त्यांना वाटतं आपल्या मुलांनी आपली स्वप्न पुरी करावीत, परंतु मुलांचे भावविश्व वेगळीकडे धाव घेत असतं .या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुलांची होरपळ होतेच. पालकांच्या आशा आकांक्षाचं ओझं त्यांना असह्य वाटायला लागतं आणि एखाद्या सोनाली सुरेकरला येळ्ळूरच्या अरवळी धरणाचा तळ जवळ करावासा वाटतो.

या भावनिक पातळीवर पालकांनीही मुलांच्याकडून किती अपेक्षा ठेवावी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अफाट पैसा, सुखासीन आयुष्य कुणाही पेक्षा आपण वरचढ असावं अश्या फालतू ऐहिक सुखाच्या मागे न धावता आपली मुलं आपल्या बरोबर सुखी समाधानी आयुष्य कसं जगतील हे पाहिलं पाहिजे.

File pic lake
File pic lake

आजकालची मुलं स्वतःच्या करियर बाबत सजग आहेत, त्यांना आपली कुवत निश्चित लक्षात येते. पालकांनी आपल्या मुलाचा कल पाहून आपल्या आर्थिक स्थतीची जाणीव करून देऊन त्यांना पुढील भवितव्य ठरवण्यासाठी मुभा दिली तर सोनाली सारख्या सोन्याचे तुकडे आपल्या कडून हरवणार नाहीत.

सोनालीच्या पाठीमागे पालकांनी सी ए करायचा अट्टहास धरला नसता, तिच्या कलाने विचार केला असता, तर कदाचित सोनाली सी ए झाली नसती, पण 91 टक्के गुण मिळवणारी सोनालीनं कुठलंतरी चांगलं यश नक्कीच मिळवलं असतं. अशी हुशार मुलगी आपल्यातुन निघून जाणे ही राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे. पालकांनो सजग व्हा…युवा ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्याची हानी करू नका..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.