Thursday, November 28, 2024

/

बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा “हा” आहे इतिहास!

 belgaum

संपूर्ण राज्याला पॉवर ट्रान्समिशन करणारे “केपीटीसीएल” आज शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी आपला 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा इतिहास…..

बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला खूप मागे 1933 सालच्या काळात जावे लागेल. जेंव्हा अमाल्गमेटेड इलेक्ट्रिसिटी कंपनी लिमिटेड ही कंपनी मुंबईमध्ये समाविष्ट झाली. अजमेर बेळगांव, मालेगांव आणि लगतच्या भागातील पालिका क्षेत्रात वीज निर्मिती करून तिचा पुरवठा करण्यासाठी ही कंपनी स्थापण्यात आली होती. या कंपनीने 1933 साली वीज उत्पादन आणि पुरवठ्याला प्रारंभ केला. त्यावेळी बेळगाव येथे बेळगाव रेल्वे स्थानकासमोर ज्या ठिकाणी सध्या हेस्कॉमचे कार्यालय आहे. त्याठिकाणी डी. बी. अंकले यांच्या या परवान्याखाली (लायसन्स) दोन जनरेटर्सच्या सहाय्याने जनरेटिंग स्टेशन सुरू करण्यात आले. कालांतराने या ठिकाणच्या जनरेटरची संख्या वाढविण्यात आली. 1966 साली या ठिकाणच्या जनरेटर्सची संख्या दोनवरून 9 इतकी झाली होती. या नऊ जनरेटर्सची एकूण क्षमता 3 हजार केव्हीए इतकी होती. या जनरेटर्सद्वारे बेळगांव शहरासह कॅम्प, टिळकवाडी व वडगांवला वीजपुरवठा केला जात होता.

1966 साली मार्चच्या 5 तारखेला बेळगावातील नेहरूनगर येथे 110 केव्हीचे स्टेशन सुरू झाले. या स्टेशनला 220 केव्ही एसआरएस हुबळीकडून 110 केव्ही सिंगल सर्किट लाईनद्वारे वीजपुरवठा केला जात होता. ज्याची स्थापित क्षमता 20 एमव्हीए इतकी होती. नेहरूनगर येथे 110 केव्ही स्टेशन सुरू होताच जनरेटर्स काढून टाकण्यात आली आणि नेहरूनगर स्टेशनमधून ग्राहकांना वीज पुरवठा केला जाऊ लागला. त्यानंतर 1969 साली 220 केव्ही बेळगाव रिसिव्हींग स्टेशन हे स्विचींग स्टेशन म्हणून कार्यान्वित करण्यात आले. याचामूळ उद्देश मेसर्स इंडाल या कंपनीला मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करणे हा होता.amalgamted-444x600

दरम्यान, कर्नाटक वीज संपादन कायदा 1974 च्या अनुरोधाने 18 डिसेंबर 1974 साली अमाल्गमेटेड इलेक्ट्रिसिटी लिमिटेड ही कंपनी कर्नाटक ईलेक्ट्रिसिटी बोर्डाने ( स्थापणा 1957) आपल्या ताब्यात घेतली. ज्यामुळे अमाल्गमेटेड इलेक्ट्रिसिटी लिमिटेडची मालमत्ता आणि उत्तरदायित्व कर्नाटक इलेक्ट्रिसिटी बोर्डकडे आले. अमाल्गमेटेड इलेक्ट्रिसिटी लिमिटेड कंपनीचे तत्कालीन विजेचे बिल शहरातील नागरिक उमेश कक्केरी यांनी 1937 सालापासून आजतागायत जपून ठेवले आहे.

1979 साली बेळगांवच्या 220 केव्ही स्टेशनपासून बेळगाव – कोल्हापूर अशी आंतरराज्य वीज वाहिनी उभारण्यात आली. त्याचप्रमाणे 1982 ते 1984 या कालावधीत दोन 50 एमव्हीए 220 केव्ही /110 केव्हीचे पाॅवर ट्रान्सफाॅर्मर स्थापन करण्यात आले. तसेच 110 केव्ही बेळगाव शहर, 110 केव्ही घटप्रभा आणि 110 केव्ही हुक्केरी स्टेशन्सना वीज पुरवठा करण्यासाठी तीन 110 केव्ही फिडर उभारण्यात आले. 1992 सालच्या कालावधीत अतिरिक्त 110 एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मरव्दारे बेळगाव स्टेशनची क्षमता वाढविण्यात आली. त्यानंतर पुन्हा 1998 च्या कालावधीत 50 एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मर नं. 2 च्या जागी नवा 100 एमव्हीए पॉवर ट्रान्सफाॅर्मर बसून स्टेशनची क्षमता 250 एमव्हीए इतकी वाढविण्यात आली.belgaum-electric

केपीटीसीएलची स्थापना 1 ऑगस्ट 1999 रोजी झाली. केपीटीसीएलने पूर्वीच्या कर्नाटक इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन (प्रेषण) आणि डिस्ट्रीब्यूशनला (वितरण) एक चांगला आकार दिला. 2001 साली टाटा पॉवर कंपनीने कणबर्गीनजीक आपला 80 एमडब्ल्यू डिझेल जनरेटर प्लांट सुरू करून 220 केव्ही स्टेशन बेळगावला 110 केव्ही डबल सर्किटद्वारे वीज पुरवठा सुरू केला.

कर्नाटक सरकारने 15 फेब्रुवारी 2002 रोजी काढलेल्या आदेशानुसार केपीटीसीएलचे विभाजन करून चार स्वतंत्र वीज वितरण कंपन्या स्थापन करण्यात आल्या. तसेच या कंपन्यांचे वीज वितरण केपीटीसीएलपासून विभक्त करण्यात आले. केपीटीसीएलकडे आता राज्यभरात विजेच्या प्रेषण अर्थात ट्रान्समिशनसह वीज निर्मिती केंद्रांची उभारणी करणे आणि 65 केव्ही वरील क्षमतेच्या वीज वाहिन्यांची देखभाल करणे ही जबाबदारी देण्यात आली आहे. नव्याने स्थापन केलेल्या चार स्वतंत्र वीज वितरण कंपन्यांची 30 एप्रिल 2002 रोजी बेंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी, मंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी, हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी आणि गुलबर्गा इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी या नांवाने अधिकृत नोंदणी झाली. या कंपन्यांचे कार्य गेल्या 1 जून 2002 रोजी सुरू झाले आहे. राज्यातील या चार कंपन्यांपैकी हुबळी इलेक्ट्रिसिटी कंपनीद्वारे (हेस्काॅम) बेळगाव शहराला वीज पुरवठा केला जातो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.