आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यानी बेळगाव जिल्ह्याचे हवाई सर्व्हेक्षण केले. यादरम्यान ते सांबरा विमानतळावर बैठकीसाठीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.कोरोनासारख्या बिकट परिस्थितीतही सरकारतर्फे कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन थकीत करण्यात आलेले नाही, त्याचप्रमाणे पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्यानाही लवकरच नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांना महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले. यावेळी पुरामुळे घरे कोसळली. घरांच्या पुनर्बांधणीसाठी पावले उचलली गेली असून पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल बांधकामासाठी अधिक निधी मंजूर करण्यात येणार आहे. याशिवाय पूरग्रस्त भागातील नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे.
यानंतर पीक नुकसान सर्व्हेक्षण प्रामाणिकपणे करण्याचीही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून यामध्ये दहा रुपयाचाही गैरव्यवहार होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येईल. आणि केंद्र सरकारच्या नियमानुसार भरपाई देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असेही आश्वासन त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.
अलमट्टी जलाशयाबाबत सर्वतोपरी प्रयत्न कारेन : मुख्यमंत्री
कर्नाटकाची जीवदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा नदीतीरावरील अलमट्टी जलाशयाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही आज सर्व्हेक्षणासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. उत्तर कर्नाटकातील अलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्यासाठी स्वतः पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करण्यात असल्याची माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिली.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यंदाही विजापूर, गदग आणि बागलकोट या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या पिकांचे आज हवाई सर्व्हेक्षण करण्यात आले. दौऱ्याच्या अधिकृत वेळापत्रकात अलमट्टी जलाशयाला भेट देण्याचा समावेश नसूनहि मुख्यमंत्र्यांनी थेट अलमट्टी जलाशयाकडे प्रयाण केले आणि कृष्णा नदीतीरावर गंगापूजन केले.त्यानंतर तीन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अलमट्टी जलाशयाच्या विकासाबाबत आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
या जलाशयाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्राला भेट देऊन समन्वय बैठक घेण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळीनि दिली. सरकारकडे वित्तपुरवठा कमी आहे, हे खरे असले तरी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.यावेळी मुख्यमंत्र्यांसहित, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, महसूलमंत्री आर. अशोक, जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यासह इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.