मारीहाळ येथील करडिगुद्दी गावाजवळ भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दाम्पत्य ठार झाले.
नागप्पा पंडितप्पा तिगडी (वय 45) आणि निर्मला नागप्पा तिगडी (वय 38, दोघे रा. मोहरे) अशी अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीची नांवे आहेत. हे उभयता मोटरसायकलवरून (क्र. केए 24 एक्स 7135) आपल्या गावाकडे निघाले असताना बेळगाव – बागलकोट रस्त्यावर करडिगुद्दी हायस्कूलनजीक केए 22 एचएस 7569 या क्रमांकाच्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.
सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या नागाप्पा यांना इस्पितळाकडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
त्याचप्रमाणे निर्मला तिगडी हिचा आज मंगळवारी सकाळी 6 वाजता उपचाराचा फायदा न होता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.