जागतिक पातळीवरील महामारी ठरलेल्या कोरोनाने रोग, उपचार आणि औषधाची निगेटिव्हिटी सोडली तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी आणली आहे. दुरावलेली नाती कोरोनामुळे जबरदस्तीने का होईना एकत्र राहू लागली. नाईलाजास्तव का असेना पण एका घरात एका छताखाली बराच वेळ एकत्र राहण्याची वेळ सर्वावर आली. आणि हल्ली एक फॅशन म्हणून जी सण-समारंभ-उत्सवाची एक वेगळीच दिशा नागरिकांनी ठरवली होती ती कोरोनाने साधी, सरळ, आणि सोप्या पद्धतीवर आणून ठेवली.
कोरोनाने केवळ नागरिकांना घरीच बसवून ठेवले नाही तर नाती-सण-उत्सव-समारंभ यांची “ओरिजिनॅलिटी” दाखवून दिली. विनाकारण आणि वायफळ खर्च करून “शो-ऑफ” करणाऱ्यांवर कोरोनाने चांगलीच संक्रांत आणली. या कोरोनामुळे आर्थिक संकटे तर आलीच परंतु यामध्ये भंपकबाजी आणि दिखाव्यामुळे विनाकारण भरडली जाणारी सामान्य जनता देखील जमिनीवर आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वधर्मीयांच्या प्रत्येक सण-समारंभावर प्रशासनाने नियम-अटी ठरवून दिल्या. आणि एकंदर सर्व कार्यक्रम आटोक्यात येऊ लागले. मोजक्याच पाहुण्यांमध्ये सर्व कार्यक्रम आटोपण्याचे आदेश प्रशासनाने दिले. आणि याचा अधिक लाभ हा गरीब जनतेला झाला. “इव्हेन्ट” म्हणून केले जाणारे समारंभ हे कौटुंबिक कार्यक्रम म्हणून साजरे होऊ लागले. जमेची बाब म्हणजे केवळ ५० लोकांची उपस्थितीला अनिवार्य ठरवली गेली, आणि लग्न समारंभात अनेक ठिकाणी काढण्यात येणारी वरातही बंद झाली.
जत्रा, यात्रा, उरूस, धार्मीक विधी, धार्मिक स्थळ या सर्व गोष्टींवर सरकारने निर्बंध घातले. आणि यामध्ये होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीवर काही अंशी वचक बसला. या अशा समारंभात अनेक सर्वसामान्य लोक भरडले जायचे. मात्र कोरोनामुळे या सर्वांवर नियंत्रण आले. आणि देव- धर्माच्या नावाने माणसानेच सुरु केलेल्या एक प्रकारच्या भंपकबाजीला थोड्याफार प्रमाणात आळा बसला. आणि महत्वाचे म्हणजे याकाळात माणुसकीचे दर्शन घडू लागले.
कोरोनामुळे जुन्या रीती रिवाजांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होऊन खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्यात येऊ लागली. मे महिना सरल्यानंतर हिंदू सणांना सुरुवात झाली. मग श्रावण महिन्याला सुरुवात झाली. या दरम्यान येणाऱ्या उत्सवावरही सरकारने निर्बंध लादले. येऊ घातलेल्या गणेशोत्सवावरही सरकारने बंदी घातली.
या दरम्यान अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव परंपरा जपण्यासाठी यंदा साधेपणात साजरा करण्याचे ठरवले. नुकतेच हुतात्मा चौकातील मंडळानेदेखील “दीड दिवसाच्या” गणपती उत्सवाचे आचरण करण्याचे जाहीर केले. पर्यायी प्रत्येक गणेशोत्सवात उत्सवाच्या नावावर होणारी वायफळ उलाढालही रोखली गेली आणि ही उलाढाल सत्कारणी लावण्याचे काही मंडळांनी ठरविले. पर्यायाने उत्सवात आगमन आणि विसर्जनावेळी होणाऱ्या मिरवणुकीतील अनेक अनिष्ट प्रकारांवरही अंकुश बसला. स्पर्धांसाठी बनविण्यात येणाऱ्या उंचच्या उंच मूर्तींवरही सरकारने निर्बंध घातले. आणि या उत्सवासाठी मार्गदर्शक सूची जाहीर केली. एकंदरीत यावर्षी गणेशोत्सवाचे मूर्त स्वरूप आणि पावित्र्य जपले जाऊन समाजहिताच्या दृष्टीने हा उत्सव साजरा होऊन गेल्या अनेक वर्षातील उत्तम उत्सव म्हणूनही गणला जाईल. याचप्रमाणे उत्सवाच्या मूळ स्वरूपाला महत्व मिळेल, हे नक्की.
यानिमित्ताने समाजात कोरोनामुळे एक चांगल्या पर्वाला सुरुवात झाली असे म्हणण्यात काहीच हरकत नाही. यापुढेही समाजातील सर्व घटकांना असे सण-समारंभ-उत्सव साजरे करताना पावित्र्य, महत्व आणि गांभीर्य ओळखण्याचे भान राहावे, आणि बुद्धीदात्या गणेशाने सर्वांना समाजहिताच्या दृष्टीचे दान द्यावे, हीच विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना!