Saturday, April 20, 2024

/

धोका वाढलाय आता दुप्पट क्षमतेने व्हा कार्यरत-जारकीहोळी यांच्या सूचना

 belgaum

येत्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक तीव्र होणार असल्यामुळे डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी सर्व कोरोना वॉरियर्सनी डोळ्यात तेल घालून दुप्पट कार्यक्षमतेने कार्यरत रहा अश्या सूचना जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहामध्ये आज मंगळवारी सकाळी आयोजित जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, पोलीस आयुक्त त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंमबरगी आमदार बेनके आदी उपस्थित होते.

आगामी दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक तीव्र होणार आहे. तसा वैज्ञानिक अहवाल हाती आला असल्यामुळे संबंधित सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून कार्यरत राहणे आवश्यक आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही जे कार्य केले आहे त्याच्या दुप्पट क्षमतेने आता येत्या दोन महिन्यात सर्वांनी कार्यरत रहावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बैठकीत केले.Meeting zp

यावेळी जिल्हा प्रशासनाची बाजू स्पष्ट करताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यात बीम्स हॉस्पिटल येथे 390 बेड्स अर्थात खाटा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्येकी 100 बेड्स असे 900 बेड्स रुग्णसेवेसाठी तयार ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे 450 ऑक्सिजन बेड्स सुसज्ज असून आयसीएमआर आणि बीम्समधील कोरोना स्वाब तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. या ठिकाणी दररोज 550 नमुन्यांची तपासणी केली जात आहे. केएलई हॉस्पिटलमधील प्रयोगशाळेत देखील दररोज 100 तपासण्या केल्या जात आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 14 दिवसांचे होम काॅरंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी वेगळी यंत्रणा कार्यरत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी आमदार पी. राजीव यांनी कोरोना संदर्भातील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटर्स बाबत प्रश्न उपस्थित केला. उपचारासाठी किती व्हेंटिलेटर्स आहेत? या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बीम्सचे वैद्यकीय संचालक डाॅ. विनय दास्तीकोप यांनी एकूण 27 व्हेंटिलेटर्स असून आतापर्यंत यापैकी 9 व्हेंटिलेटर्सचा उपयोग करण्यात आला असल्याचे सांगितले. जिल्ह्यात कोरोनाबाधित सात गर्भवती महिलांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत पावलेले 35 ते 60 वर्षे वयोगटातील असल्याची माहितीही डाॅ. दास्तीकोप यांनी दिली. सदर माहिती ऐकून घेऊन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार करताना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वांनी जास्तीत जास्त कार्यक्षम राहून कोरोना विरुद्ध लढा द्यावा, असे सांगितले.

जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही. यांनी कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पूर्णक्षमतेने जनजागृती केली जात असल्याचे सांगितले. ताप, खोकला, टिबी आदी लक्षणे आढळून येणार यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वांनीच सोशल डिस्टंसिंगसह कोरणा संदर्भातील अन्य नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले विधानपरिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घेतली जावी, अशी सूचना केली. जिल्हा पंचायत सभागृहामध्ये मंगळवारी झालेल्या या कोरोना प्रादुर्भाव आढावा बैठकीस आजी-माजी लोकप्रतिनिधींसह संबंधित सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.