गेल्या बुधवारी रात्री एका रुग्णाच्या मृत्यूनंतर बीम्स हॉस्पिटलवर दगडफेक करून रुग्णवाहिका पेटवून दिल्याप्रकरणी आज रविवारी आणखी 7 जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केल्यामुळे गजाआड झालेल्या आरोपींची एकूण संख्या 22 झाली आहे.
दानिश युसुफ चांदवाले (वय 19 वर्षे, रा. जालगार गल्ली, बेळगांव), फरदीन मोहम्मद अजीम देसाई (वय 19, रा. जालगार गल्ली, बेळगांव), सलमान जिलानी होंगल (वय 21, रा. चिराग गल्ली, बेळगांव), आसिफखान जफरउल्लाखान पठाण (वय 37, रा. जालगार गल्ली, बेळगांव),
शाहिद जहूरअहमद बोजगार (वय 21, रा. जालगार गल्ली, बेळगांव), हर्षद रियाजअहमद मनियार (वय 27, रा. जुने गांधिनगर, बेळगांव) आणि फजल मोहम्मदगौस मुल्ला (वय 22 वर्षे, रा. घी गल्ली, बेळगांव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे.
गेल्या बुधवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमधील कोवीड -19 वाॅर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांसह उपस्थित जमावाने हॉस्पिटलवर तुफान दगडफेक करीत आवारातील वाहनांचे नुकसान करण्याबरोबरच एक रुग्णवाहिका पेटवून दिली होती. या घटनेची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आल्यानंतर एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगाने कारवाई करत गेल्या तीन दिवसांपासून अटकसत्र सुरू केले आहे.
प्रारंभी अवघ्या 12 तासात 8 जणांना गजाआड करणाऱ्या पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी आज आणखी 7 जणांना ताब्यात घेतल्यामुळे अटक केलेल्यांची संख्या 22 झाली आहे.अटक केलेल्या 22 पैकी 13 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांचे विलगिकरण झाले आहे.