सोमवारी एपीएमसी अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.एपीएमसी मध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत नाही.त्यामुळे अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीचे अधिकार आमदार सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले आहेत.जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर हे दोघे चर्चा करून अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी नावे निश्चित करणार आहेत.
अध्यक्ष,उपाध्यक्ष स्थानासाठी 11 जण इच्छुक आहेत.पण जारकीहोळी घेतील तो निर्णय अंतिम असणार आहे.सगळ्यांना मान्य होईल असा निर्णय घेण्यासाठी जारकीहोळी याना कसरत करावी लागणार आहे.
एकूण निवडून आलेले सदस्य अकरा आहेत.त्यापैकी काँग्रेस 5,भाजप 1,समिती 3,इतर 2 असे आहेत.याशिवाय सरकार नियुक्त सदस्य सहा असून त्यांना मतदानाचा हक्क आहे पण निवडणूक लढवण्याचा त्यांना अधिकार नाही.
एपीएमसीची सूत्रे सध्या सतीश जारकीहोळी यांच्याकडे आहेत ते काय भूमिका घेणार?मागील निवडणुकी प्रमाणे लक्ष्मी विरुद्ध सतीश असा कलगीतुरा यावेळी रंगणार नसल्याचे सध्याच्या वातावरणा वरून दिसत आहे मात्र भाजपची सत्ता असल्याने पालकमंत्री रमेश जारकीहोळी आपली सत्ता आणण्यासाठी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीचे तीन सदस्य आहेत ते भाजपच्या बाजूने जातात की नेहमी प्रमाणे सतीश जारकीहोळी यांच्याकडे रहातात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. समितीच्या तीन पैकी दोन सदस्य एकीकडे तर एक सदस्य एकीकडे असे सध्याचे चित्र आहे त्यामुळे सोमवारी सतीश जारकीहोळी काय करणार कुणाच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडणार?मराठी चेहरा अध्यक्ष होणार का?हे देखील महत्वाचे आहे.