राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 22 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 249 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 9,399 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे 5,730 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेले दोन दिवस बेळगाव जिल्ह्यासाठी मात्र दिलासादायक ठरले असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 309 इतकी स्थिर आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 21 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 22 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 249 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 11 आंतरराष्ट्रीय, तर 50 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,523 असून यापैकी 80 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 111 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,730 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आणखी 5 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 142 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
गेल्या 24 तासात बेंगलोर शहरांमध्ये सर्वाधिक 126 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील एकूण 30 जिल्हे कोरोनाबाधित असून यामध्ये बेंगलोर शहर सर्वाधिक एकूण 1,392 रुग्णांसह प्रथम स्थानावर आहे. बेंगलोर शहराखालोखाल कलबुर्गी (1,226) आणि उडपी (1077) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
काल सायंकाळपासून या तीन जिल्ह्यांसह राज्यातील विजयापुरा, मंगळूर, दावणगिरी, कारवार, बागलकोट, बिदर, चिक्कमंगळूर, धारवाड, बेंगलोर ग्रामीण, रामनगर, चित्रदुर्ग, कोलार, तुमकुर, कोडगु, यादगिरी, म्हैसूर, चिकबळ्ळापूर ,गदग व कोप्पळ या जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.