अवघ्या आठवड्याभरात कर्नाटक सरकारने दिल्ली आणि तामिळनाडू राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या होम काॅरन्टाईनच्या धोरणांमध्ये पुन्हा बदल केला आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि मुंबई येथून येणाऱ्या प्रवास यांच्या बाबतीतील 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन व 7 दिवसांचे होम काॅरन्टाईनचे धोरण कायम असणार आहे.
राज्य सरकारने आज गुरुवारी आपल्या धोरणातील नव्या बदलाची घोषणा करताना दिल्ली व तामिळनाडू राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन होण्याची गरज नाही, मात्र त्यांना होम काॅरन्टाईन व्हावे लागेल असे स्पष्ट केले आहे.
या संदर्भात बोलताना महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले की, सरकारने काॅरन्टाईनच्या मार्गदर्शक सूचीत बदल केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातून येणार्या प्रवाशांना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन सक्तीचे असेल. परंतु हा नियम तामिळनाडू आणि दिल्लीच्या बाबतीत लागू असणार नाही. यापूर्वीच्या नियमानुसार तामीळनाडू व दिल्ली या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने तीन दिवस इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन व्हावे लागत होते.