बेळगाव जिल्ह्याचे इन्चार्ज सेक्रेटरी एल. के. अॅटिक यांनी आज शनिवारी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावासंदर्भात संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीत एल. के. अॅटिक यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक विशेषता श्वसनाचा विकार असलेल्या वृद्ध व्यक्तींसह ताप आणि इतर संसर्गावर योग्य पाळत ठेवण्याची सक्त सूचना आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. रक्तदाब, मधुमेह, हृदय आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्यांना वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येत असतात. त्यासाठी अशा लोकांना सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल्समध्ये योग्य खबरदारी घेऊन जनतेला वैद्यकीय सेवा पुरवली जावी, असे अॅटिक यांनी सांगितले.
ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही त्यांना वैद्यकीय सेवा सुविधांपासून वंचित ठेवले जाऊ नये असे सांगून करण्यासंदर्भात घशातील स्त्रावाचा तपासणीसाठी बीम्स हॉस्पिटलमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी काॅरन्टाईन मार्गदर्शक प्रणालीचा भंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात असल्याचे सांगितले. जिल्ह्यात 45 अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन्स आहेत, तसेच सध्या कोणताही कोरोना सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्ण व्हेंटिलेटरवर नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटल्सना कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांसाठी जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. मुनियाळ यांनी जिल्ह्यातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्र आणि अन्य राज्यातून आलेल्या प्रवाशांशी संबंधित असल्याची माहिती दिली. बैठकीस आरोग्य, पोलीस आदी विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.