Saturday, April 27, 2024

/

बेळगावातील उत्तुंग राष्ट्रध्वजासाठी “अटारी मॉडेल”चा अवलंब?

 belgaum

देशातील अटारी बॉर्डरवर 12 महिने 24 तास फडकणारा जो राष्ट्रध्वज आहे तो ज्या कपड्यापासून बनविण्यात आला आहे त्याची माहिती घेऊन तशा पद्धतीचा राष्ट्रध्वज येत्या 15 ऑगस्टपासून बेळगाव किल्ला तलाव येथील देशातील उत्तुंग ध्वजस्तंभावर फडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिली.

बेळगाव किल्ला तलाव येथील देशातील 110 मीटर इतक्या सर्वात उंच ध्वजस्तंभावर तब्बल पाच महिन्याच्या खंडानंतर आज पुन्हा राष्ट्रध्वज चाचणीदाखल फडकविण्यात आला. यानिमित्ताने “बेळगाव लाइव्ह”शी आमदार ॲड. अनिल बेनके बोलत होते. ते पुढे म्हणाले की, किल्ला तलाव येथील देशातील सर्वात उंच असा राष्ट्रध्वज गेल्या 26 जानेवारी रोजी तांत्रिक बिघाडामुळे फडकविण्यात आला नव्हता. या राष्ट्रध्वजाच्या स्तंभाची उभारणी मुंबई येथील तंत्रज्ञांनी केली आहे. हे तंत्रज्ञ कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे बेळगावला येऊ शकत नसल्यामुळे सदर ध्वजस्तंभातील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी स्थानिक तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली. या तंत्रज्ञांनी संबंधित दुरुस्ती केल्यामुळे आता पाच महिन्यानंतर या ध्वजस्तंभावर आज पुन्हा राष्ट्र ध्वज फडकत असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले. बेळगावची शान असणारा हा राष्ट्रध्वज कायम फडकत रहावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. परंतु समस्या अशी आहे की पाऊस पडल्यानंतर ध्वजाचे वजन वाढवून आणि भिजून ध्वज फाटत आहे. राष्ट्रध्वजाला थोडी जरी क्षती झाली तरी कायद्यानुसार तो फडकवता येत नाही. यासाठी ध्वजाचा अवमान होण्यापेक्षा पावसाळ्यात हा फडकवू नये असे आमचे मत आहे. त्यामुळे सध्या हा ध्वज फडकला असला तरी पाऊस आल्यास तो पुन्हा स्तंभावरून उतरविला जाईल, असे आमदारांनी स्पष्ट केले.

देशातील अटारी बॉर्डरवरील राष्ट्रध्वज कोणत्या कपड्यापासून अथवा कशा पद्धतीचा आहे हे पहावे लागणार आहे. त्याची माहिती घेऊन तो राष्ट्रध्वज जर 12 महिने 24 तास फडकत असेल तर बेळगावातील हा ध्वज का पडत नाही? याचा तांत्रिक दृष्ट्या विचार केला जाईल. किल्ला तलावाच्या ठिकाणचा हा सर्वांत उंच राष्ट्रध्वज बारा महिने चोवीस तास फडकत राहावा अशी आपली तीव्र वैयक्तिक इच्छा असल्याचेही आमदारांनी सांगितले.

 belgaum

किल्ला तलाव येथील राष्ट्रध्वजाच्या बाबतीत बुडा आणि महापालिकेचे अधिकारी फारसे स्वारस्य अथवा जागरुकता दाखवत नाहीत. याठिकाणी काहीवेळा राष्ट्रध्वजाचा अवमान ही झाला आहे. यासंदर्भात बोलताना मागील वेळी राष्ट्रध्वज चक्क जमिनीवर ठेवण्यात आला होता. त्यावेळी आपण बुडाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून पुन्हा असा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले. एकूणच राष्ट्रध्वजाचा अवमान सहन केला जाणार नाही. सर्वांनी त्याची काळजी घेणे अनिवार्य आहे असे सांगून अटारी बॉर्डर येथे ज्या कपड्यापासून बनविलेला राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो तसा राष्ट्रध्वज येत्या 15 ऑगस्टपासून किल्ला तलाव येथील ध्वजस्तंभावर कायम फडकत राहील यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ही आमदार बेनके यांनी “बेळगाव लाईव्ह”ला सांगितले.

बेळगाव किल्ला तलाव येथील 110 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज हा देशातील सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज आहे. भारतातील अटारी बॉर्डर पेक्षा उंच असलेल्या या राष्ट्रध्वजाचे क्षेत्रफळ 1,600 चौ. मी. इतके आहे. तांत्रिक बिघाडामुळे गेल्या पाच महिन्यापासून किल्ला तलावाच्या ठिकाणी असलेला हा राष्ट्रध्वज फडकला नव्हता. स्थानिक तंत्रज्ञांना हाताशी धरून ध्वजस्तंभातील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्यानंतर आज बुधवारी हा राष्ट्रध्वज फडकवण्याची चाचणी घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.