तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या एका 17 वर्षीय युवतीचा शहरातील एका नामवंत खाजगी इस्पितळातील कर्मचाऱ्यांच्या अमानवीय वर्तनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना कॅम्प येथे सोमवारी उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मृत्यू पावलेल्या दुर्दैवी युवतीचे नांव नेहा गोविंद पाटील (वय 17, रा. तेलगू कॉलनी कॅम्प) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मधुमेहग्रस्त असलेल्या नेहाच्या शरीरातील साखर रविवारी अचानक वाढल्यामुळे ती अस्वस्थ झाली. परंतु त्यावेळी तिच्यावर उपचार करण्यासाठी कॅम्पमधील एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता आणि दवाखानेही बंद होते. या संदर्भात बोलताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य रिझवान बेपारी यांनी कॅम्प परिसरात 10 हून अधिक दवाखाने आहेत. परंतु हे येथील सर्व डॉक्टर आपले कर्तव्य विसरून फक्त पैसे कमावण्याच्या मागे लागले आहेत असा आरोप केला. त्यामुळेच स्नेहाला त्रास होत होता त्यावेळी कॅम्प येथे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे हॉस्पिटल उपचारासाठी उपलब्ध होते. परंतु नेहाच्या घरच्यांनी तिला शहरातील एका नामवंत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे संबंधित हॉस्पिटलमध्ये नेहाला घेऊन जाताच तिला दाखल करून घेण्यासाठी प्रथम घरचा पत्ता आणि आधार कार्डची विचारणा करण्यात आली. जेंव्हा नेहा ही कंटेनमेंट झोन असलेल्या कॅम्प येथील रहिवासी असल्याचे निदर्शनास येताच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिची प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना तपासणी करून आणा त्यानंतरच आम्ही तिला उपचारासाठी दाखल करून घेऊ शकतो, असे पाटील कुटुंबीयांना सांगितले.
तेव्हा पाटील कुटुंबीय आणि त्यांना वारंवार विनंती केली की, तुम्ही प्रथम नेहाला दाखल करून घेऊन उपचार सुरू करा. त्यानंतर आवश्यक ते सर्व कांही करता येईल. परंतु संबंधित हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिला दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी नाइलाज झाल्याने नेहाच्या कुटुंबीयांनी तिला घेऊन कोरोना तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. मात्र दुर्दैवाने कोरोना तपासणीची प्रक्रिया सुरू असतानाच नेहाने शेवटचा श्वास घेतला.
या प्रकारामुळे संतप्त झालेले कॅम्प येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते कादिम बेपारी यांनी संबंधित खाजगी हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अमानवीय वर्तनाचा धिक्कार करून एका निष्पाप मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित सर्वांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कॅम्प भागात बरेच दवाखाने आहेत. परंतु लाॅक डाऊनच्या काळात ते कायम बंदच असतात. जिल्हा प्रशासनाने सर्व डॉक्टरांना त्यांचे दवाखाने सुरू करण्यास सांगितले आहे. परंतु कॅम्प येथील एकही डॉक्टर आपला दवाखाना उघडत नाही. तेंव्हा नेहा हिचा मृत्यूस कॅम्प येथील डॉक्टरांनाही तितकेच जबाबदार धरावे, अशी मागणीही कादीम बेपारी यांनी केली आहे.
दरम्यान, दुर्देवी नेहा पाटील हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या यांविरुद्ध आंदोलन छेडण्याचा विचार कॅम्प येथील रहिवासी करत आहेत. तसेच बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत या मुद्द्यावर आवाज उठविणार असल्याचे बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले आहे.