गेल्या दोन महिन्यात अत्यावश्यक अशा चार टप्प्यातील लॉक डाऊनच्या अंमलबजावणीमुळे आता कुठे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. हा धोका लक्षात घेऊन मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे शैक्षणिक वर्ष जून-जुलै ऐवजी येत्या सप्टेंबर 2020 किंवा त्यानंतर सुरू करावे आणि शाळादेखील तेंव्हाच सुरू कराव्यात, अशी मागणी सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे हे सरकारकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन सिटीझन्स कौन्सिलतर्फे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांना धाडण्यात आले.
कर्नाटक सह संपूर्ण देश सध्या अत्यंत धोकादायक कोरोना प्रादुर्भावाच्या संकटातून वाटचाल करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन आणि जनतेचे संघटित प्रयत्न ही काळाची गरज आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार अत्यंत उत्तम कामगिरी करत आहे राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकार करत असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. गेल्या दोन महिन्यातील अत्यावश्यक अशा लॉक डाऊनच्या चार टप्प्यातील अंमलबजावणीनंतर आता कुठे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. खबरदारीच्या मार्गदर्शक सूचीनुसार आपल्याला ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका त्यांना आहे. सध्या लहान शाळकरी मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जात असते तरीही शाळा सुरू झाल्यानंतर ही मुले जेंव्हा ऑटोरिक्षा बस गाड्या अथवा अन्य प्रवासी वाहनाने शाळेला जायला लागतील. तेंव्हा सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन अशक्य होणार आहे.
दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू होतात जून आणि जुलै हे पावसाळ्याचे दिवस असल्याने या काळात सर्दी-पडशामुळे मुले आजारी पडतात. यंदा कोरोनाचे महाभयंकर संकट उद्भवले आहे. सध्या मुले घरातच असल्याने ती सुरक्षित आहेत. परंतु शाळेत जाताना अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. लहान मुलांकडून सामाजिक आंतर पाळले जाईलच असे नाही. एकंदर सध्याच्या परिस्थितीत मुले जर शाळेसाठी घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गेल्यास त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे शैक्षणिक वर्ष जून-जुलै ऐवजी येत्या सप्टेंबर 2020 किंवा परिस्थिती पाहून त्यानंतर सुरू करावे, अशा आशयाचा तपशील सिटीझन्स कौन्सिलने शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे.
यासंदर्भात अनेक शिक्षण तज्ञांनी देखील शाळा इतक्यात सुरू करू नयेत असे म्हटले आहे. याकडे कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी सरकारचे लक्ष वेधले असून त्यांनी शिक्षण खात्याचे संयुक्त संचालक प्रसन्नकुमार यांची भेट घेतली वरील विषय त्यांना समजावून सांगितला. बेळगाव जिल्हा विनाअनुदानित शाळा संघटनेचे अध्यक्ष शेवंतीलाल शाह यांनी सुद्धा शाळा सप्टेंबरनंतरच सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे. कौन्सिलचे सदस्य व कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड एन. आर. लातूर यांनी शिक्षण सहसंचालकांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. सिटीझन्स कौन्सिलतर्फे गुरुवारी निवेदन देतेवेळी उपरोक्त सर्वांसह कौन्सिलचे सदस्य विजय आचमनी उपस्थित होते.