कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवार दि. 25 मे 2020 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण बेळगाव शहरात “साप्ताहिक कर्फ्यू” जारी केला जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिली आहे.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत बेळगाव शहर संपूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे लोकांना जे कांही जीवनावश्यक साहित्य अथवा अन्य खरेदी करायची असेल ती आज सायंकाळी सात वाजेपर्यंत करावी. त्यानंतर सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. जर कोणी घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी केले आहे.
बेळगाव शहरात आज सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत “साप्ताहिक कर्फ्यू” असल्यामुळे उद्या रविवारच्या दिवशी बाजारपेठ पूर्णपणे बंद असणार आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सोमवारी होण्याची शक्यता आहे चांद दिसण्यावर रमजान ईद अवलंबून आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना ईदची जी कांही खरेदी करायची आहे ती आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे इनमिन कांही तासात करावी लागणार आहे.