कर्नाटक राज्याने रविवार सकाळपर्यंत तब्बल 2.03 लाख कोरोना तपासण्यांचा टप्पा गाठला असून राज्यातील 57 आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये या तपासण्या घेण्यात आल्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी रविवारी ही माहिती दिली. गेल्या 8 मे रोजी विक्रमी 1लाख तपासण्या झाल्या होत्या, त्याच्या दुप्पट हा आकडा आहे.
गेल्या 8 मे रोजी 1 लाख कोरोना तपासण्याची नोंद झाल्यानंतर गेल्या अवघ्या 16 दिवसात आम्ही त्याच्या दुप्पट संख्येने तपासण्या केल्या आहेत. राज्यातील 57 आयसीएमआर कोव्हीड – 19 प्रयोगशाळांमध्ये रविवारी सकाळपर्यंत 2.03 लाख कोरोना तपासण्या आल्या आहेत. ही कामगिरी अत्यंत प्रशंसनीय असून मी संबंधित डॉक्टर व प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांचे अभिनंदन करतो, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ सुधाकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
*राज्यात 130 नवे कोरोनाग्रस्त*
दरम्यान, कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात काल शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 24 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 130 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2089 इतकी वाढली आहे. यापैकी आत्तापर्यंत 654 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधितांनामध्ये 105 जण परराज्यातील असून दोन आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 1391 इतके असून यापैकी 17 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

*जिल्ह्यात 9,846 जणांचे निरीक्षण*
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 24 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 9,846 जणांचे निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 121 इतकी असून परजिल्ह्यातील (बागलकोट) पाॅझिटिव्ह रुग्ण 8 आहेत.
वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 24 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 9,846 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 2,043 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 49 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 4,285 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 3,469 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 8,550 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 121 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसीस 59 असून आतापर्यंत जिल्ह्यातील 79 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.