लॉक डाऊन काळात कोरोना योद्धे सदैव कार्यरत असल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून रविवारी लॉक डाऊनच्या शेवटच्या दिवशी देशातील तीनही संरक्षण दलालांकडून त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आदींना भेटवस्तू देऊन सन्मानित केले गेले.
मागील वर्षी पूरपरिस्थितीच्या काळात मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर अर्थात मराठा सेंटरच्या जवानी गोकाक, अथणी वगैरे तालुक्यातील शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. त्याच मराठा सेंटरचे नूतन कमांडंट रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व जवान रविवारी सकाळी सिव्हिल (बीम्स) हॉस्पिटल येथे दाखल झाले. या सर्वांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाची बाजी लावण्यात आघाडीवर असलेल्या सिव्हिल (बीम्स) हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह कोरोना बाधित रुग्णांसाठी असणाऱ्या खास वार्डातील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व वॉर्ड बॉईज यांची सामाजिक अंतर ठेवून भेट घेतली. तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देण्याद्वारे त्यांचे मनोबल वाढविले.
बीम्स हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी देखील सीमेवर लढणाऱ्या जवानांचे हे कौतुक आनंदाने स्वीकारून धन्यवाद व्यक्त केले.
विशेष म्हणजे याप्रसंगी मराठा सेंटरचे नूतन कमांडंट रोहित चौधरी यांनी डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचार्यांसह खासकरून स्वच्छता कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढून त्यांना प्रोत्साहित केले. आपल्या या भेटीप्रसंगी कमांडंट रोहित चौधरी यांनी हॉस्पिटलमधील कोरोना संदर्भातील उपचार पद्धतीची माहिती जाणून घेतली. तसेच हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर बसविलेल्या डिसइन्फेक्टंट टनलला भेट देऊन माहिती घेतली.