ग्रामीण भागात आता बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेकजण भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांची योग्य ती तपासणी करून त्यांना विशेष जागेमध्ये ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही व्यक्ती बाहेरून आली तर त्यांची सर्व ती खबरदारी घेण्याची व तपासणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. एस बी बोमनहळळी यांनी सांगितले आहे.
नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. बाहेरून येताना ज्याने परवानगी आणली आहे व त्याने परवानगी घेतली नाही अशांची जबाबदारीही ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे यापुढे ग्रामपंचायतीने विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. काही ग्रामस्थ बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विरोध करत आहेत मात्र ते नागरिक भारत देशाचे आहेत, त्यांना शाळा समुदाय भवन इतर संस्था या सरकारी संस्थांमध्ये ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी या अवधीत ग्रामपंचायतीची विशेष कमिटी नेमण्यात आली आहे. जर या कमिटीने ही काळजी घेतली नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी बोमनहळळी यानी सांगितले आहे.
सुरुवातीला 14 दिवस कॉरनटाइनमध्ये ठेवण्यात येणार, त्यानंतर त्यांची तपासणी व त्यानंतर जर अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी जाऊ देण्यात येणार आहे. यासाठी ही सर्व ती जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने कोणत्याही दुर्लक्ष करू नये व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना त्यांची व्यवस्था करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी जेवण पाणी शौचालय यासह इतर सर्व सुविधा ग्रामपंचायत करणार आहे. याची जर तजवीज करण्यात दिरंगाई करण्यात आली तर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.